ठाणे : खासदार संजय राऊत यांच्या विरोधात कापुरबावडी पोलीस ठाण्यात माजी महापौरांनी तक्रार दाखल केली असतांनाच, गुरुवारी याच महिला आघाडीने ठाण्यातील मनोरुग्णालयाबाहेर राऊत यांच्या विरोधात आंदोलन केले. तसेच त्यांच्याकडून होणाऱ्या बेताल वक्तव्यांवरुन त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने त्यांना आता उपचारांची गरज असल्याचे म्हणत मनोरुग्णालयात त्यांच्या नावाचा अर्ज भरण्यात आला आहे.
शिवसेना विरुध्द उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात मागील काही दिवसापासून चांगलेच खटके उडत आहेत. त्यात राऊत यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात केलेल्या आरोपानंतर ठाण्यातील शिवसेना महिला आघाडी संतप्त झाली आहे. बुधवारी रात्री कापुरबावडी पोलीस ठाण्यात राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर गुरुवारी पुन्हा माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक मनोरुग्णालाबाहेर आंदोलन करण्यात आले. तसेच संजय राऊत यांच्या नावाने रुग्ण भरतीचा अर्ज मनोरुग्णालयाचे अधीक्षक नेताजी मुळीक यांना दिला. संजय राऊत हे पूर्वी आमचे नेते होते. त्यांची मानसिक स्थिती ढासळली असल्याने हा अर्ज केल्याचे शिंदे म्हणाल्या.