महाविकास आघाडीच्यावती मुंबईत काढण्यात आलेल्या महामोर्चासाठी ठाण्याहून मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईला गेले आहेत. या लोकांच्या मनामध्ये आक्रोश आहे. सरकारमधील नेतेमंडळींकडून होत असलेल्या महापुरुषांबद्दल करत असलेल्या वक्तव्यांविरोधात हा आक्रोश आहे. मात्र, मुंबईतील हा महामोर्चा दडपण्यासाठी अशा प्रकारचे राजकारण करून ठाण्यामध्ये आंदोलन केले जात आहे. असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
यात नागरिकांना वेठीस धरले जात आहे. यात रिक्षा चालकांना मारहाण केलेली आहे. परिवहन सेवा बंद केली आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देण्यात आला आहे. हे सर्व करून या लोकांना काहीही मिळणार नाही. या लोकांनी वारकऱ्यांसाठी हा संप केलेला आहे. परंतु खुद्द वारकरी हे आमच्या सोबत आहेत. या ठिकाणी त्यांनी माझी भेट घेतली. उगाच जूनं पुराण काढायचं आणि अशा प्रकारचं नवीन नाटक करायचं हे धंदे चालू आहेत. ठाण्यातून जवळपास 5000 हून जास्त नागरिक मुंबईला पोहोचत आहेत. शरद पवार यांच्या समवेत मीही मोर्चामध्ये सामील होत आहे, असेही आव्हाड यावेळी म्हणाले.