बदलापूर : वीज बिल दरवाढ संदर्भात मंगळवारी बदलापूर शहरात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने कंदील भेट आंदोलन करण्यात आले. २०० युनिटपर्यंत वीजबिल माफ करावे तसेच ३० दिवसानंतर रीडिंग घेण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, वीज मीटर भाडे कपात करण्यात यावी अशा विविध मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या. सलग दोन वर्षापासून कोरोना काळात नागरिकांनी अनेक समस्यांना तोंड दिले आहे. या काळात नागरिकांना महावितरणकडून दिलासा मिळावा यासाठी मंगळवारी बदलापूर नगरपालिकेसमोर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
वीजपुरवठा खंडित करणाऱ्या सरकारला जाग यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नागरिकांना वीज बिलातून दिलासा मिळावा यासाठी हे आंदोलन केल्याची माहिती संजय ढिलपे यांनी दिली.
या आंदोलन वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतले, मात्र काही वेळाने त्यांना सोडून दिले. या आंदाेलनात बहुजन मुक्ती पार्टीचे बदलापूर शहर अध्यक्ष एकनाथ जाधव, युवा अध्यक्ष अक्षय जाधव, महिला अध्यक्षा रंजना त्रिभुवन, उपाध्यक्ष मानसी येलवे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
------------------