मुरबाड : दोनशे वर्षाची परपंरा असलेल्या आणि पौष पौर्णिमेपासून सुरू होणा-या म्हसा यात्रेपुढे यंदाही मूलभूत सुविधांचे आव्हान आहे. म्हसा रस्त्याचे अपूर्ण काम, पार्किंगवर अद्याप न निघालेला तोडगा आणि पाणीपुरवठ्याबाबत ठोस निर्णय न झाल्याने लाखोंच्या संख्येने येणा-या भाविकांची गैरसोय टाळण्याचे काम प्रशासनाला युद्धपातळीवर करावे लागणार आहे.मुरबाड-कर्जत रस्त्यावरील म्हसा गावातील ही यात्रा यंदा २ जानेवारीला सुरु होत आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू या राज्यात ही यात्रा प्रसिद्ध आहे. खांबलिंगेश्वर म्हसोबा हे शंकराचे देवस्थान असलेल्या या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गुरांचा बाजार. तो शेकडो एकर माळरानावर भरतो आणि ५० हजारांच्या आसपास देखण्या, आकर्षक जनावरांची खरेदी-विक्र ी या यात्रेत होते. मागली वर्षी बैलजोडी दोन लाखापर्यंत विकली गेली होती. गोवंश हत्याबंदीनंतर या बाजारात गेल्यावर्षी तुलनेने कमी जनावरे आल्याचे निरीक्षण नोंदवले गेले.यात्रेकरूंच्या मनोरंजनासाठी येथे महाराष्ट्रातील तमाशा फड येतात. त्यातील गण-गवळण आणि वगनाट्य पाहण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील लोक यात्रेत हजेरी लावतात. यात्रेत नवस फेडणाºयांची गर्दी असते.घोंगडी बाजार हे या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य. जरी मऊ रजया मिळत असल्या, तरी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या घोंगड्या, सतरंज्या येथे भरपूर खरेदी केल्या जातात. हातोलीसारखे मिठाईचे पदार्थ खास जत्रेसाठी बनवले जात असल्याने त्यासाठी तसेच एरव्ही जत्रेत खरेदी केल्या जाणाºया गोडी शेवेसारख्या पदार्थांसाठी खवय्यांची गर्दी होते. पारंपरिक पद्धतीची-जुन्या घाटाची भांडी-लोखंडाचे तवे आणि अन्य गृहोपयोगी वस्तुही मिळत असल्यामुळे म्हसा यात्रेत बैल बाजार, घोगंडी बाजार, भांडी बाजार, मिठाई गल्ली यांच्या पेठा पाहायला मिळतात.जत्रा असल्याने चक्री पाळणे, मुलांसाठीची मनोरंजनाची साधने, खेळणी, मौत का कुआँ, डान्स पार्टी, जादुचे खेळ पाहायला गर्दी होते. हल्ली बैलबाजार अवघे दोन ते तीन दिवस चालतो. पण मनोरंजनाच्या इतर साधनांमुळे यात्रेत दोन आठवडे गर्दी असते.>पार्किंगचे आव्हान : वेगवेगळ््या दिवशी मिळून लाखो भाविक यात्रेत हजेरी लावतात. यात्रेसाठी एसटीच्या जादा बसेस असतात. पण खाजगी वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे पार्किंगची समस्या दरवर्षी भेडसावते. त्यासाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. त्यावर प्रशासनाचे नियंत्रण नसते. शिवाय वाहने बाहेर काढण्यातही शिस्त नसल्याने कोंडी होते आणि किलोमीटरभर लांब रांगा लागतात. त्यावर प्रशासनाने काय उपाय योजले आहेत, ते अजून जाहीर केलेले नाहीत. रहदारीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम, तसेच मुरबाड-म्हसा रस्त्याचे काम अजून सुरू आहे. शिवाय कर्जतच्या दिशेचा रस्ताही खराब आहे. अनेक ठिकाणी पुलांचे कठडेही तुटलेले आहेत.>पाण्याचा प्रश्न कायमचयात्रेतील भाविकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून परिसरातील विहिरींचे निर्जंतुकीकरण केले जाते. त्याऐवजी तात्पुरत्या नळजोडण्या देण्याची मागणी दरवर्षी केली जाते. पण यंदाही ती पूर्ण होण्याची शक्यता नाही. यात्रेच्या काळात तात्पुरत्या वीजजोडण्या दिल्या जातात. पण अवघे २० ते २५ मीटर पुरवले जात असल्याने वीजचोरीची तक्रार होते. मागणी करूनही दुकानांच्या संख्येच्या प्रमाणात ही सोय उपलब्ध करून दिली जात नाही. या काळात रस्त्यावर दिव्यांची सुविधा मात्र उपलब्ध होते.>मंदिर परिसरातील गर्दी : यात्रेला आलेली प्रत्येक व्यक्ती खांबलिंगेश्वराचे दर्शन घेऊनच पुढे जाते. पण मंदिराच्या आवारात गर्दी कमी करण्याच्या उपाययोजना फार नसतात. तेथे फेरीवाल्यांची गर्दी असते. ती कमी केल्यास मंदिराच्या आवारात भाविकांना मोकळेपणाने दर्शन घेता येऊ शकते.
म्हसा यात्रेपुढे आव्हान मूलभूत सुविधा पुरवण्याचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 3:36 AM