कल्याण : केडीएमटी व्यवस्थापनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये वाढ करत परिवहन समितीने ९८ कोटी ७४ लाख रुपये जमा व ९६ कोटी ६४ लाख रुपये खर्च, अशा दोन कोटी १० लाख रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्पाला बुधवारी पार पडलेल्या विशेष सभेत एकमताने मान्यता दिली. भांडवली आणि महसुली अनुदानाबरोबरच भविष्य निर्वाह निधीत वाढ करताना मृत कर्मचा-याच्या कुटुंबाला तत्काळ २५ हजार रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. आता हा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला जाईल.उपक्रमाचे व्यवस्थापक मारुती खोडके यांनी ९१ कोटी ३५ लाख जमेचा व ८९ कोटी २५ लाख रुपये खर्चाचा शिलकी अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर केला होता. यात समितीने सात कोटी ३९ लाखांची वाढ केली आहे. भांडवली तरतूद म्हणून व्यवस्थापनाकडून पाच कोटी रुपये ठेवण्यात आले होते. यात समितीने दोन कोटींची वाढ केली आहे. महसुली अनुदानासाठी ३० कोटींची तरतूद होती. यात एक कोटींची वाढ केली आहे. कर्मचारी थकीत देणी रक्कम पाच कोटींवरून आठ कोटी करण्यात आली आहे. कार्यशाळा कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी १० लाखांची तरतूद होती, त्यात ४० लाखांची वाढ करण्यात आली आहे. इमारत दुरुस्तीसाठी २५ लाख, आॅइल खरेदी २५ लाख, बस धुण्यासाठी (वॉशिंग) पाच लाखांची तरतूद ठेवली आहे. भविष्य निर्वाह निधीच्या हिश्श्यासाठीही दोन कोटींची तरतूद समितीने ठेवली आहे.विशेष म्हणजे मृत कर्मचाºयाच्या कुटुंबाला तत्काळ २५ हजार रुपये आर्थिक मदत करण्यासाठी अर्थसंकल्पात पाच लाखांची तरतूद करण्यात आली आहे. बुधवारच्या समितीच्या सभेत अर्थसंकल्पावर चर्चा करताना सदस्यांच्या सूचनाही विचारात घेण्यात आल्या. या सूचनांवर व्यवस्थापनाने कार्यवाही करावी, असे आदेश देताना सभापती मनोज चौधरी यांनी अर्थसंकल्प मंजूर करण्यात येत असल्याचे जाहीर केले.‘उत्पन्नात मोठी वाढ झाली पाहिजे’महिनाभरात केडीएमटीच्या उत्पन्नात वाढ झालीच पाहिजे, असे मत चर्चेदरम्यान सर्वपक्षीय सदस्यांनी मांडले. केडीएमसीच्या अनुदानावर अवलंबून न राहता उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करा, अशा सूचना करताना शिवसेनेचे सदस्य सुनील खारूक यांनी महासभेकडून अर्थसंकल्पात मंजूर केली जाणारी तरतूद पूर्णपणे मिळते का, असा सवाल केला.बसवर फलक नसल्याने बस कोणत्या मार्गासाठी चालते, याची माहिती प्रवाशांना मिळत नाही. त्यामुळेही उत्पन्नावर परिणाम होत असल्याचा मुद्दा शिवसेनेचे सदस्य मधुकर यशवंतराव यांनी मांडला.आम्ही दोन वर्षांपूर्वी समितीवर आलो, तेव्हा दैनंदिन उत्पन्न सहा लाख होते. परंतु, ते आता साडेतीन लाखांपर्यंत खाली का आले, याचा खुलासा करावा, अशी मागणी भाजपचे सदस्य प्रसाद माळी यांनी केली.यंदाच्या वर्षात १३७ बस चालविण्याचे उद्दिष्ट उपक्रमाचे आहे. कर्मचाºयांच्या नियुक्त्या आणि सुटे भाग खरेदीसाठी निविदा काढल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नात फरक पडेल, असा दावा व्यवस्थापनाने केला.पनवेल, भिवंडी, एमआयडीसी या जादा उत्पन्न देणाºया मार्गावर बसफेºया वाढवा, असे आदेश चौधरी यांनी दिले. नवनीतनगर, दावडी व लोढा हेवन येथेही जादा बस सोडण्याची मागणी संजय पावशे यांनी केली होती. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही व्हावी, याकडेही चौधरी यांनी लक्ष वेधले.केडीएमटी बसथांब्यांचे पालटणार रूपडे, लवकरच स्टेनलेस स्टीलचे थांबकल्याण : महापालिकेचा उपक्रम असलेल्या केडीएमटीचे बसथांबे मोडकळीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लवकरच शहरात स्टेनलेस स्टीलचे बसथांबे उभारले जाणार असल्याने त्यांचे रूपडेच पालटणार आहे. पहिल्या टप्प्यात १५० थांबे उभारले जाणार असून व्यवस्थापनाने त्याचा प्रस्ताव शुक्रवारी होणाºया परिवहन समितीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवला आहे.केडीएमटीचे सध्याचे बसथांबे हे गंजले आहेत. त्यांची देखभाल-दुरुस्तीच होत नसल्याने त्यांची ही अवस्था झाली आहे. या थांब्यांचा कपडे वाळत घालण्यासाठीही वापर होत असल्याचे चित्रही काही भागांत दिसते. त्यामुळे हे थांबे प्रवाशांसाठी निरुपयोगी ठरले आहेत. आता हे थांबे काढून त्याजागी स्मार्ट सिटीअंतर्गत नवीन स्टेनलेस स्टीलचे १५० बसथांबे पहिल्या टप्प्यात बसवले जाणार आहेत.त्याचबरोबर प्रवाशांच्या मागणीनुसार दुसºया टप्प्यात ५० स्टेनलेसचे बसथांबे उभारण्यात येणार आहेत. यासंदर्भातील निविदेचा प्रस्ताव व्यवस्थापनाने मंजुरीसाठी शुक्रवारच्या परिवहनच्या सभेत मंजुरीसाठी ठेवला आहे.यासंदर्भात तिघांच्या निविदा उपक्रमाकडे आल्या होत्या. यातील एक निविदा अपात्र ठरली, तर दोघांमध्ये अटी-शर्तींची पूर्तता करणाºया मे. सन एन. स्टार अॅडव्हर्टायझिंग प्रा.लि. यांची निविदा उपक्रमाकडून स्वीकारण्यातआली आहे.शून्य भांडवलावर उभारणार थांबेकंत्राटदाराकडून स्वत:च्या खर्चाने हे बसथांबे उभारण्यात येणार आहेत. त्यांनीच पाच वर्षे देखभाल दुरुस्ती करायची आहे. तसेच उपक्रमाला मंजूर दराने कंत्राटदाराकडून भाडे दिले जाणार आहे.पण, त्याबदल्यात स्टेनलेस स्टीलच्या थांब्यांवर जाहिरात प्रसिद्ध करून त्याचे उत्पन्न कंत्राटदार घेणार आहे. त्यामुळे शून्य भांडवलावर परिवहनकडून हा उपक्रम राबवला जाणार आहे.
मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला तत्काळ २५ हजारांची मदत, केडीएमटीच्या अर्थसंकल्पात तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 12:29 AM