कल्याण : कल्याण ग्रामीण मतदारसंघातील बाह्यरस्ते अत्यंत खराब झाले असून, ते एमएमआरडीए कार्यक्षेत्रातील आहेत. त्यामुळे या रस्ते विकासासाठी ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एमएमआरडीए आयुक्तांकडे केली आहे.
यात मानपाडा ते उंबार्ली, समाधान हॉटेल ते वीटभट्टीपर्यंतचा रस्ता, वीटभट्टी ते घेसर, घेसर ते वडवली, दहिसर ते निघू, निघू ते बामल्ली, बामल्ली ते वाकळण, वाकळण ते बाळे, निळजे डांबर प्लांट ते स्मशानभूमी, निळजे स्माशनभूमी ते वेताळेश्वर मंदिर, निळजे व्यंकटेश मंदिर ते निळजे प्राथमिक आरोग्य केंद्र, मानपाडा कोळे रस्ता ते तेरेसा स्कूल या रस्त्यांचा समावेश आहे.
त्याचबरोबर स्टार कॉलनी ते मानपाडा सर्कल रस्त्यासाठी २७ कोटी आणि डोंबिवलीतील पेंढरकर कॉलेज ते पाथर्ली रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणासाठी पाच कोटी रुपये मंजूर करावेत, ही मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे त्यांनी केली आहे.