ठाणे - पीआरटीएस वैगेरे आम्हाला काही माहिती नाही, आधी कळवा, मुंब्य्राच्या अंतर्गत मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या महासभेत ठेवा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. अन्यथा महासभा उधळून लावू असा इशाराही त्यांनी दिला आहे. याशिवाय या मेट्रोचे काम ठाण्यातील अंतर्गत मेट्रो सोबतच सुरु करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. त्यामुळे कळव्यातील अंतर्गत मेट्रोचा वाद आता आणखी चिघळणार असल्याचेच दिसत आहे. मागील महिन्यात कळवा, मुंब्य्रासाठी मेट्रो द्यावी अशा आशयाचे फलक राष्ट्रवादीतर्फे कळवा, मुंब्रा भागात लावण्यात आले होते. परंतु अगदी दोनच दिवसात कळवा, मुंब्रासाठी मेट्रो दिल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानल्याचे फलक शिवसेनेकडून लावण्यात आले होते. त्यामुळे अंतर्गत मेट्रोच्या निमित्ताने पुन्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगल्याचे पहावयास मिळाले. आपल्या कामाचे श्रेय शिवसेनेने घेतल्याने हे राष्ट्रवादीच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. त्यामुळेच आता येत्या महासभेत कळवा, मुंब्य्रातील अंतर्गत मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा अन्यथा महासभा चालू देणार नसल्याचा इशारा आव्हाडांनी बुधवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिला. यावेळी त्यांच्या समवेत शहर अध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेवक सुहास देसाई आदी उपस्थित होते. केवळ कळवा, मुंब्य्रापर्यंत ही अंतर्गत मेट्रो सिमीत न ठेवता, पडले, दिवा, दातिवली या भागातही ती नेण्याची मागणी त्यांनी केली आहे.एकूणच जो पर्यंत अंतर्गत मेट्रोचा डिपीआर सादर होत नाही, तो पर्यंत कोणतीही महासभा सुरु होता देणार नसल्याचे आव्हाडांनी स्पष्ट केले.
पीआरटीएस माहित नाही, आधी अंतर्गत मेट्रोचा डिपीआर सादर करा, राष्ट्रवादीचा प्रशासनाला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 3:59 PM
कळवा, मुंब्य्रातील अंतर्गत मेट्रोचा वाद आता आणखी चिघळणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जो पर्यंत या मेट्रोचा डीपीआर सादर होत नाही, तो पर्यंत महासभा होऊ देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.
ठळक मुद्देदिवा, पडले, दातिवली भागातही हवी मेट्रोश्रेयवादाची लढाई चिघळणार