ठाणे-: मुंबई असो या ठाणे या सारख्या शहरांमध्ये वाढत्या हवेतील प्रदूषणाबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्याच अनुषंगाने ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) काम लागले आहे. त्या विभागाने शहरातील पीयूसी केंद्रांची झाडाझडती सुरू केली आहे. तसेच गेल्या नऊ दिवसात वाहनांची पीयूसी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये ६७ वाहनांवर ८८ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. हवेतील वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे .
वेळीच उपाय शोधला नाही तर मोठा चिंतेचा विषय बनू शकतो. त्यामुळे वाहनातील उत्सर्जित धुरावाटे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग सतर्कतेने काम करतो आहे. वाहना बरोबर पीयूसी केंद्राची तपासणी मोहीम सुरू केली आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात १ ते ९ नोव्हेंबर या दिवसात वाहनाच्या पीयूसी तपासणी ६७ वाहनांची पीयूसी नसल्याचे आढळून आले आहे. यावेळी दोषी वाहन धारकांना पीयूसी चलान देऊन ८८ हजारांचा दंड वसूल केला असल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे यांनी दिली.
* आरटीओचे या मार्गांवर ठेवले लक्षशहरातील प्रमुख रस्त्यावर सकाळी अथवा संध्याकाळच्या वेळेत वाहनाच्या गर्दीतून वाट काढताना, वाहनातील धुराचा त्रास प्रकर्षाने जाणवतो. मात्र अशा प्रदुषण करणाऱ्या वाहनावर ठाणे आरटीओची करडी नजर आहे. गेल्या नऊ दिवसात द्रुतगती मार्ग, घोडबंदर रोड बरोबर शहरातील प्रमुख रस्त्यावर विभागाचे वायूवेग पथकाने वाहने आणि पीयूसी केंद्र लक्ष केली आहेत. " काहीजण याकडे दुर्लक्ष करत, बिनधास्त वाहतुकीचे नियम मोडत आहेत. अशा वाहनावर दंडात्मक कारवाई सुरू असून वाहन मालकांनी त्वरित गाडीचे पीयूसी प्रमाणपत्र घ्यावे. "- जयंत पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे .