प्रज्ञा म्हात्रे, ठाणेप्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांना आधार कार्ड काढून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला खरा, पण अशी कार्डे काढून देणारी यंत्रणा पुरविण्यास कोणीही तयार होत नसल्याने मनोरुग्णांना ‘आधार’ देण्याची योजना लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. मनोरुग्णांनाही भविष्यात सर्व लाभ मिळावेत, त्यांचीही नागरिक म्हणून नोंदणी व्हावी, यासाठी त्यांना आधार कार्ड देण्याची योजना आखून मनोरुग्णालयाच्या प्रशासनाने प्रयत्न गेले काही दिवस प्रयत्न सुरू केले. मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी, समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामावून घेण्यासाठी; तसेच त्यांचा शोध घेण्यासाठी या आधार कार्डांचा फायदा होईल, असे मनोरुग्णालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेनासे झाले आहे. सुरूवातीला मनोरुग्णालय प्रशासनाने ठाणे महापालिकेशी याबाबत पत्रव्यवहार केला. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही लोकप्रतिनिधींशी संपर्क साधल्यावर त्यांनीही ‘करु’, ‘पाहू’ अशी उत्तरे देत ठेंगा दाखविला. आधार कार्ड केंद्रांशी संपर्क साधल्यावर त्यांनी तर अनेक शंका उपस्थित केल्या. मनोरुग्ण प्रतिसाद देतील का, असा सवालही त्यांनी केला. त्यानंतर काही सामाजिक संस्थांशी संपर्क केला. पण त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद न आल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांना आधार कार्ड काढून देणाऱ्या यंत्रणेच्या शोधात फिरावे लागले. (प्रतिनिधी)
मनोरुग्णांना ‘आधार’ मिळेना
By admin | Published: January 05, 2017 5:46 AM