ठाणे : श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेत मासिक पाळीबाबत जनजागृती होणार आहे. म्युज फाउंडेशनने हा पुढाकार घेतला आहे. तर मराठी ग्रंथ संग्रहालयाच्यावतीने पु. ल. देशपांडे यांच्या जनशताब्दी सोहळ्याचे औचित्य साधून त्यांच्यावर आधारीत चित्ररथ सहभागी होणार आहे.श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्ष स्वागतयात्रेच्या पूर्वतयारी संदर्भात सोमवारी ज्ञानकेंद्र सभागृहात बैठक झाली. यावेळी विविध संस्थांच्या सहभागाचा आढावा घेण्यात आला. सरस्वती मंदिर ट्रस्टच्यावतीने जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिके आणि मराठी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक विभागाकडून विद्यार्थी बस मधून सहभागी होणार आहेत. शून्य कचरा या विषयावर चित्ररथ तर एसटी लव्हर ग्रुपच्यावतीने नवीन रु पात आलेली एसटीची बस, तसेच, यंदा जोशी बेडेकर महाविद्यालयाला ५० वर्षे पूर्ण झाली असून महाविद्यालयाच्यावतीने एक चित्ररथ साकारण्यात येणार असून त्यात जवळपास ३०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तर न्यू इंडिया इन्शुरन्स, मराठा मंडळ, भारत सहकारी बँक, तेली समाज अशा विविध संस्था सहभागी होणार आहेत.यंदा शोभा यात्रेत १०० संस्थांना सहभागी करून घेण्याचा आयोजकांचा मानस आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ६ ते ७ या वेळेत कौपीनेश्वर मंदिराच्या प्रांगणात समस्त ठाणेकर, राष्ट्र सेविका समिती महिला पौरोहित्य वर्गाचे सामुदायिक अथर्वशीर्ष, शिवमहिम्न, रुद्र पठण होणार असून कला, नृत्य, नाट्य, संगीत यांचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्र मदेखील होणार आहेत. त्यानंतर महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत दीपोत्सव होणार असून यावेळी स्वातंत्र्य देवता आणि गंगा आरती होणार आहे. दरवर्षीप्रमाणे वेशभूषा, छायाचित्रण स्पर्धा तसेच, महिलांची बाईक रॅली होणार आहे. स्वागतयात्रेत सहभागी होण्यासाठी फॉर्म भरणे अनिवार्य असून शहरातील सामाजिक संस्थानी श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या कार्यालयात रोज संध्याकाळी ७ ते ९ यावेळेत संपर्क साधण्याचेआवाहन विश्वस्त विद्याधर वालावलकर यांनी केले.कौपिनेश्वर मंदिरातून सकाळी ७ वा. पालखीयंदा शनिवार ६ एप्रिल रोजी गुढीपाडवा असून सकाळी ७ वा. श्री कौपीनेश्वर मंदिरातून पालखीचे प्रस्थान होणार आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही स्वागतयात्रेचा समारोप गडकरी रंगायतनच्या आवारात होणार आहे.स्वागतयात्रेच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक सुहास मेहता असणार आहेत. गेल्यावर्षी हे पद उद्योजिका डॉ. मेधा मेहेंदळे यांनी भूषविले होते.
यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेत मासिक पाळीबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:30 AM