डोंबिवली: हेल्मेट घालणे सक्तीचे असतांनाही दुचाकीस्वार सर्रास त्या नियमाचे उल्लंघन करतात. हे त्यांच्या जीवावर बेतू शकते. वाहनचालकांनी हेल्मेट घालुनच प्रवास करावा असे आवाहन करण्यासाठी डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण विभागाने ‘हेडलेस लाइफ’हा उपक्रम गुरुवारी शहरात राबवला.वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक गोविंद गंभीरे यांनी सांगितले की, ठाण्याचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडलेस लाईफ हा जनजागृतीपर उपक्रम शहरात पूर्वेला घेण्यात आला. इंदिरा गांधी चौकामध्ये हेडलेस असलेली व्यक्ती दुचाकी स्वारांना आवर्जून थांबवत होती, आणि हेल्मेटचे महत्व विषद करत होती. त्याला दुचाकीस्वारांनीही चांगला प्रतिसाद दिला, आणि यापुढे विनाहेल्मेट प्रवास न करण्यासंदर्भात ग्वाही दिली. गंभीरे म्हणाले की, अशा जनजागृतीमुळे नागरिकांना हेल्मेटचे महत्व पटेल, अन्यथा नागरिकांमध्ये बेदरकारपणे गाड्या चालवणे, वेगाने गाड्या चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे अशी प्रवृत्ती वाढीस लागेल. हे वाहनचालकांच्या जीवाशी खेळणे आहे. दिवसागणिक रस्ते अपघातांचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात सुरुच असल्याने शून्य अपघाताचा दिवस हे लक्ष्य गाठणे एक आव्हान झाले आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे, चारचाकी चालवणा-यांनी सीट बेल्ट लावणे, वाहतूक नियमांचे पालन करणे हे केल्यास सुखद सुरक्षित आणि संरक्षित प्रवासाची हमी मिळेल असेही आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले. डोंबिवलीतील युवा दुचाकीस्वारांनी यापुढे हेल्मेट घालण्याचा प्रयत्न करु, वाहतूक नियमांचे पालन करु असे सांगत उपक्रमाला प्रतिसाद दिला. डोंबिवलीतील नागरिकांनी वाहतूक शाखेच्या उपक्रमाला दिलेल्या जनजागृतीमध्ये सामील होऊन या उपक्रमाचे महत्व जाणुन घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
डोंबिवलीत वाहतूक पोलिसांची जनजागृती : विनाहेल्मेट प्रवास केल्यास जीवावर बेतू शकते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 5:11 PM
हेल्मेट घालणे सक्तीचे असतांनाही दुचाकीस्वार सर्रास त्या नियमाचे उल्लंघन करतात. हे त्यांच्या जीवावर बेतू शकते. वाहनचालकांनी हेल्मेट घालुनच प्रवास करावा असे आवाहन करण्यासाठी डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण विभागाने ‘हेडलेस लाइफ’हा उपक्रम गुरुवारी शहरात राबवला.
ठळक मुद्देउपक्रमाला वाहनचालकांचा उदंड प्रतिसाद‘हेडलेस लाइफ’हा उपक्रम