उल्हासनगर : महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण, प्लास्टिक पिशव्या बंदी जनजागृती बाबत एसएसटी महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी नेहरू चौक, दूध नाका आदी ठिकाणी पथनाट्ये करून जनजागृती करण्यात आली. आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांच्यासह अन्य महापालिका अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
उल्हासनगर महापालिका आरोग्य विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने प्लास्टिक बंदी व स्वच्छ भारत अभियान बद्दल जनजागृती करण्याकरता एसएसटी महाविद्यालयाच्या मुलांनी कॅम्प नं-३ येथील नेहरू चौक व कॅम्प नं-५ येथील दूध नाका ठिकाणी पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाला महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनिष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, स्वच्छता निरीक्षक, सफाई मुकादम, सफाई मित्र व सिटी को-ऑर्डिनेटर इत्यादी उपस्थित होते.
शहरात एकीकडे महापाकिकेच्या वतीने प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती होत असताना दुसरीकडे सर्वत्र प्लास्टिक पिशव्या मिळत असल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे. प्लास्टिक बंदी नावालाच असून शहरात प्लास्टिक पिशव्या बनविणारे कारखाने व होलसेल दुकाने सर्रासपणे सुरू आहेत. महापालिका सार्वजनिक आरोग्य विभाग, प्रभाग समिती अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त सुभाष जाधव यांनी शिक्षण मंडळासारखी झाडाझडती घेण्याची मागणी होत आहे.