उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील जुगाराच्या अड्ड्याची तोडफोड केल्या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख कैलास तेजी, महिला आघाडी प्रमुख जया तेजीसह २८ जणांवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. शेकडो कुटुंबाला देशोधडीला लावणाऱ्या अवैध धंद्याचे अड्ड्याची तोडफोड केल्या प्रकरणी रामनवमीच्या दिवशी शिवसेना शिवनगर शाखेकडून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे.
उल्हासनगरात अवैध धंद्याच्या विरोधात आमदार कुमार आयलानी यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी पोलिस उपायुक्त कार्यालयाला निवेदन दिले. तसेच हा प्रश्न विधानसभेत आमदार आयलानी व बालाजी किणीकर यांनी उचलला होता. असे असताना शहरात अवैध जुगाराचे अड्डे व ऑनलाईन जुगार सुरू असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून होत होता. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कॅम्प नं-५ येथील दोन जुगार अड्ड्याची तोडफोड केल्याने एकच खळबळ उडाली.
हिललाईन पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर बंद जुगार अड्डयांची तोडफोड केल्याचा ठपका ठेवून, याप्रकरणी शहरप्रमुख कैलास तेजी, महिला आघाडी प्रमुख जया तेजी यांच्यासह २८ जणांवर गुन्हे दाखल केले. जुगार अड्ड्यामुळे शेकडो कुटुंब देशोधडीला लागले असून असे अड्डे उध्वस्त केले म्हणून शिवनगर लालचक्की शिवसेना शाखेच्या वतीने त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी रामनवमीच्या दिवशी त्यांचा जाहीर सत्कार केल्याची माहिती माजी विरोधी पक्षनेते दिलीप मालवणकर यांनी दिली.
शहरातील अनैतिक धंद्याचे अड्डे असलेली लाॅजिंग, डान्सबार व क्लब बंद पाडण्यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, जुगाराचे अड्डे उध्वस्थ केले. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. यासाठी त्यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित केल्याचे मालवणकर म्हणाले. यावेळी शिवसेना नेते राजेंद्र शाहु, शहर प्रमुख कैलास तेजी व महिला आघाडीच्या प्रमुख जया तेजी, सुनिता गव्हाणे, प्रतिभा कालेकर, प्रिती भोसले यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या, उपशहर प्रमुख मधुकर साबळे, शाखा प्रमुख राजू शिंदे, प्रफुल्ल भोसले, रविंद्र महाजन यांच्यासह शिवसैनिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.