ठाणे : एकीकडे कोरोनाच्या नियमांचे पालन आणि दुसरीकडे सामाजिक उपक्रम राबवत सार्वजनिक मंडळांचा गणेशोत्सव साजरा होत असल्याचे चित्र ठाणे शहरात आहे. सध्याचा काळ आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने आरोग्य शिबिरे आयोजित करण्याकडे मंडळांचा कल आहे.
शुक्रवारी गणरायाचे आगमन झाले असून, शनिवारी दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप देण्यात आला आहे. पाच दिवसांच्या गणरायाचे विसर्जन मंगळवारी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत कोरोना नियमांचे पालन करीत आणि शासनाने घालून दिलेल्या अटींनुसार सार्वजनिक मंडळे गणेशोत्सव साजरा करीत आहेत. गर्दी होणार नाही, आरतीच्या वेळी गणेशभक्त एकत्र येणार नाहीत, याची विशेष काळजी घेतली जात आहे. गर्दी होऊ नये यासाठी ऑनलाइन दर्शनाची सोयही केली आहे. बहुतांशी मंडळांनी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी आयोजित करण्याचे योजिले असल्याचे मंडळांनी सांगितले.
-------------------------
शासनाच्या अटीनुसार मंडप छोटा केला असून, चार फुटांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. यंदा पडद्यावरच सजावट केली आहे. दर्शनासाठी गणेशभक्त येत आहेत. गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. पाटपूजन होते तेव्हा रक्तदान शिबिर आयोजित केले होते. सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे.
- रोहन घाडीगावकर, भानू युवक मित्रमंडळ, वर्तकनगर
...................
यंदा आम्ही सजावट म्हणून भिंतीवर पेंटिंग केली आहे. मूर्ती दोन फुटांची आणली आहे. एकाचवेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते एकत्र जमणार नाहीत, याची काळजी घेत आहोत. १६ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर घेतले जाणार आहे. येणाऱ्या गणेशभक्तांना कोरोनाचे नियम समजावून सांगितले जात आहेत. सॅनिटायझरची व्यवस्था केली असून, शरीराचे तापमान तपासले जात आहे. दर्शनाला येणाऱ्या गणेशभक्तांचे नाव, नंबर, पत्तादेखील लिहून घेतला जात आहे.
- विवेक घारगे, डवलेनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, लोकमान्यनगर
...........
आमच्या मंडळातर्फे यंदा रक्तदान शिबिर घेतले जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. भाविक दर्शनाला येत आहेत, पण गर्दी होत नाहीये. मंडळाच्या फेसबुक पेजवरून ऑनलाइन दर्शनदेखील देत आहोत.
- समीर सावंत, वागळेचा राजा
.............
आम्ही आमच्या ग्रुपचा दीड दिवसांचाच गणेशोत्सव साजरा केला. गर्दीवर नियंत्रण ठेवले होते. मोजकेच कार्यकर्ते व पदाधिकारी आरतीला येत होते. फेसबूक लाईव्ह करून गणेश भक्तांना ऑनलाइन दर्शनदेखील दिले. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाने मास्क लावले की नाही, हे तपासले जात होते.
- विनायक गाडेकर, दी ब्रदर्स प्रतिष्ठान, पाचपाखाडी