ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वेबिनार पद्धतीने होणा-या महासभेमुळे अनेक नगरसेवकांना सभागृहात बोलणे शक्य होत नाही किंवा प्रभागातील अनेक समस्यांचा ऊहापोह होत नाही. या वेबिनार महासभांमधील विषय घाईघाईत मंजूर करण्यात आले. कोणते विषय मंजूर झाले, ते बहुतांश नगरसेवकांना समजले नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या धर्तीवर नगरसेवकांची कोरोना चाचणी घेऊन गडकरी रंगायतन किंवा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात महासभा भरवावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
या जनहित याचिकेसोबतच आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाही या संदर्भात पत्र दिल्याचे ते म्हणाले.
कोरोनाचे कारण पुढे करून प्रत्यक्ष महासभा न झाल्यामुळे ठाणे शहरातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर थेट चर्चाच होत नाही. यामुळे ठामपा प्रशासनाने सोशल डिस्टन्सचा अवलंब करून विधिमंडळाच्या धर्तीवर गडकरी रंगायतन किंवा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात महासभा आयोजित करावी, अशी मागणी करणारी याचिका अॅड. सुहास ओक यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्यायालयानेही ती दाखल करून घेतली असून जनहित याचिका क्रमांक ३४५०/२०२१ वर लवकरच सुनावणी घेतली जाणार आहे. यानंतर आता पठाण यांनी ही याचिका दाखल केली आहे.