ठाणे : म्युझ फाउंडेशन आणि ठाणे महानगरपालिका यांनी एकत्रितपणे शहरातील स्वच्छतागृहामध्ये भारतातील पहिल्या मासिक पाळीच्या खोलीचे अनावरण केले. महिलांना त्यांच्या मासिक पाळीमध्ये सार्वजनिक शौचालयाचा वापर करणे अत्यंत अवघड आहे, त्यासाठी मासिकपाळीच्या खोलीची संकल्पना उदयास आली.
म्यूज फाऊंडेशनने २०१९ साली ठाण्यामध्ये शाश्वत मासिक पाळीच्या उपक्रमाअंतर्गत मासिक पाळीच्या सवयींबाबत १००० महिलांचे १५ विभागांमध्ये सर्वेक्षण केले होते.या सर्वेक्षणामधून असे निष्कर्षास आले की झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या महिला सार्वजनिक शौचालायावर अवलंबून असतात , तसेच पाणीकपात, अस्वछ खोल्या आणि सॅनिटरी पॅडच्या कचरा व्यवस्थापनेचा अभाव अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
म्यूज फाउंडेशन आणि ठाणे महानगरपालिका यांच्या सौजन्याने योग्य प्रकारे विचार करून एक संकल्पना उदयास आली आहे. या संकल्पनेला मासिक पाळीची खोली असे नाव देण्यात आले आहे. ह्या खोलीचा आराखडा रिसायकल बिन नावाच्या संस्थेने बनविलेला असून सामान्य महिलेचा विचार करून सर्व सुखसोयीनीं उपयुक्त अशी बनविलेली आहे.ही खोली लोकमान्य नगर , पाडा क्र. ४, लोकमान्य नगर,ठाणे येथील सार्वजनिक शौचालायात बांधण्यात आलेली आहे.
मासिक पाळीच्या खोलीमध्ये नळ ,जेट स्प्रे ,आरसा ,सॅनिटरी पॅडचा निचरा होण्यासाठी कचरापेटी ज्यातील कचरा हाताचा वापर न करता काढण्यासाठी खालच्या बाजूने झाकण दिलेले आहे तसेच साबणाची बाटली, कपडे अडकवण्याकरिता खिळे आणि बाथरूम ची सोय सुद्धा केलेली आहे. अश्या ह्या सुसज्ज खोलीची रचना रिसायकल बिन नावाच्या संस्थेने केलेली असून झोपडपट्टीतील महिलांच्या गरजा ओळखून बनवलेली आहे. म्यूज फाऊंडेशन, मासिक पाळीच्या खोली बद्दल महिलांना या संवेदनशील विषयावर ज्ञान देण्यासाठी हा उपक्रम हाती घेत आहे. इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅलूस हे सदर कार्यक्रमाचे प्रायोजक होते.