पंकज पाटील ।अंबरनाथ : कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने जनजागृती केलेल्या खर्चापैकी निम्मा खर्च हा लोकसहभागाच्या माध्यमातून करण्यात आला आहे, तर उर्वरित खर्च महापालिकेच्या निधीतून करण्यात आला आहे
अंबरनाथ नगरपालिकेने मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली. शहरात सुरु वातीच्या काळात मुख्य रस्त्यांवर तीन एलईडी व्हॅन उभ्या करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. ज्या मार्गावरून मुंबईला जाणारे कामगार येजा करीत होते, त्या मार्गावर या एलईडीच्या माध्यमातून जाहिरात करण्यात आली. त्यासाठी पालिकेने रुपयादेखील खर्च केला नाही. तो खर्च लोकसहभागाच्या माध्यमातून करण्यात आला. स्थानिक केबल वाहिनीवर करण्यात आलेल्या जाहिरातींचा खर्चदेखील लोकसहभागातून केला. शहरात बॅनर लावणे, रिक्षा आणि चारचाकी वाहनांच्या माध्यमातून जनजागृती करणे, यासाठी पालिकेने सुमारे तीन लाखांच्या आसपास खर्च केला. जाहिरातींची सर्वात महत्त्वाची जबाबदारी अंबरनाथ नगरपालिकेच्या घंटागाडीनेच पार पाडली. दररोज या घंटागाड्या शहरभर फिरत असल्याने त्याच घंटागाड्यांनी जनजागृतीचे संदेश दिले.