ठाणे: व्यास क्रिएशन्सतर्फे ‘इस्रायलमध्ये भारतीय वीरांची शौर्यगाथा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गडकरी रंगायतन येथे पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून लेफ्ट. जन. डॉ. डी. बी. शेकटकर यांनी जो राष्ट्र, समाज आपल्या शुरविरांचे पराक्रम विसरतो तो अधोगतीच्या दिशेने जातो असे परखड मत व्यक्त केले. या सोहळ््याला प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. लेवी ए. रुबेन्स, पुस्तकाचे मुळ लेखक रवि कुमार, पुस्तकाचे मराठी अनुवाद करणारे वर्षा कोल्हटकर, अनिल कोल्हटकर, ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर, व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड व इतर उपस्थित होते. यावेळी याच पुस्तकाचे ई बुकचे देखील प्रकाशन करण्यात आले. आपले मनोगत व्यक्त करताना लेफ्ट. शेकटकर पुढे म्हणाले की, भारत - इस्राइलमध्ये चांगले संबंध आहेत. कोणतेही राष्ट्र, राज्य, राष्ट्रनेता आपल्या राष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रहीत तयार करत असते. अशा ठिकाणी राष्ट्रनितीच्या संरक्षणासाठी राजनीती-कुटनीती ही वेगळी झाली तर युद्धनीती करावी लागते. भारत - इस्राइलचे मैत्रीपुर्ण संबंध आहेत ते आणखीन दृढ व्हावे, दोन्ही देशांत शांतता, समृद्धी आणि विश्वास आहे तो अधिक वाढावा, या दोन्ही देशांतील मैत्रीपुर्ण संबंध हे पुढच्या पिढीपर्यंत समजले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. अॅड. रुबेन म्हणाले की, भारत - इस्राईल या दोन्ही देशांनी एकत्र येऊन प्रगती करावी, या दोन्ही देशांनी एकत्र यावे कारण हे दोन्ही देश शांतताप्रिय देश आहेत. रवी कुमार म्हणाले की, भारत आणि इस्राईल ही एक मोठी शक्ती बनू शकते. हे दोन्ही देश मित्र आहे आणखीन चांगले मित्र होऊ शकतात. कार्यक्रमाच्या सुरूवातीला निलेश गायकवाड, वर्षा कोल्हटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.