लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरातील राजकारण, समाजकारण व साहित्य क्षेत्रात गेल्या ४५ वर्षांपासून वावरणारे दिलीप मालवणकर यांच्या ‘राजकारणाच्या प्रदेशात’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या जन्मदिनी रविवारी झाले. यावेळी शाहीर संभाजी भगत, कवी अरुण म्हात्रे, अभिनेते अनिल दादा गवस तसेच ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधारे आदी उपस्थित होते.
शहरातील कोमसाप, मराठी साहित्य परिषदेमध्ये कार्यरत असलेले महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दिलीप मालवणकर यांच्या ६५व्या जन्मदिनानिमित्त हा सोहळा आयोजित केला होता. यावेळी अग्निशमन दलाच्या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला. तसेच वैद्यकीय अधिकारी, साहित्यिक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
अभिनेते अनिल गवस यांची मुलाखत कवी अरुण म्हात्रे यांनी घेतली, तर शाहीर संभाजी भगत यांनी आपल्या पहाडी आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कवी अरुण म्हात्रे यांनी दिलीप मालवणकर यांच्या काव्यसंग्रहाचे कौतुक केले. आजच्या काळात दर्जेदार लेखनाचा अभाव असताना मालवणकर यांच्या दर्जेदार कविता संग्रहामुळे साहित्य क्षेत्र संपन्न झाल्याचे ते म्हणाले. मालवणकर यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार पप्पू कलानी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, गायिका निशा भगत, नगरसेवक राजेश वानखडे, अंजली साळवे, प्रमोद टाले, माजी नगरसेवक शांताराम निकम, नाना पवार, ॲड. गोपाळ भगत, काँग्रेसचे शहाराध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी आदींनी कार्यक्रमाला हजेरी लावली.
..........