- दिनेश पठाडेवाशिम - जिल्ह्यात ३ मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा राबविला जाणार आहे. ० ते ५ वर्षे वयोगटातील १ लाख २८ हजार २७३ बालकांना पोलिओचा डोस दिला जाणार आहे.
मोहिमेसंदर्भात जिल्हा समन्वय समितीच्या सभेत नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य संस्थेच्या वैद्यकीय अधिकारी यांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. ग्रामीण भागात ९१ हजार ६६५ तर शहरी भागातील ३६ हजार ७११ बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील एकही लाभार्थी सदरील लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांनी आरोग्य यंत्रणेला २७ फेब्रुवारी रोजी दिल्या आहेत. लसीकरण मोहीम राबविण्यासाठी जिल्ह्यात २०८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
वंचित बालकांसाठी घरोघरी लसीकरण३ मार्च रोजी राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेत बुथवरील ज्या बालकाचे लसीकरण झाले नाही, अशा बालकांकरिता ५ मार्चपासून विशेष मोहीम राबविली जाणार आहे. ग्रामीण भागात ३ तर शहरी भागात पाच दिवस घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून वंचित बालकांना पोलिओचा डोस दिला जाणार आहे.