ठाणे : फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर कमी झाले असले, तरी शेवग्याच्या शेंगा महागच आहेत. शंभरीच्या उंबरठ्यावर आलेली भेंडी स्वस्त झाली आहेत. तेलाची आवक कमी झाल्याने त्याचे दर मात्र वाढत आहेत. दुसरीकडे महागलेली तूरडाळ स्वस्त झाली आहे. फळांमध्ये एकीकडे केळी महाग तर दुसरीकडे सफरचंद स्वस्त झाले आहेत, असे विक्रेत्यांनी सांगितले.
काही दिवसांपासून भाज्यांचे दर कमी होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे. तेलाने घरचे बजेट कोलमडले आहे. तेलाचे दर वाढतच चालले आहेत. सध्या तेलाची आवक कमी झाल्याने ५ ते १० रुपयांनी तेलाचे दर वाढत असल्याचे किराणा मालाचे विक्रेते मयूर तन्ना यांनी सांगितले. तूरडाळ मात्र स्वस्त झाली असून तिचा भाव २० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे ग्राहक समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. पपई, सफरचंद, डाळिंब, केळीच्या भावात चढउतार असल्याचे फळविक्रेते शिवकुमार वर्मा यांनी सांगितले. भाज्या स्वस्त झाल्या आहेत. फळभाज्यांकडे ग्राहकांचा अधिक कल असल्याचे भाजीविक्रेते रवी कुर्डेकर यांनी सांगितले.
यंदा काही शेतकऱ्यांनी शेवग्याच्या शेंगांचे पीक घेतले नसल्याने त्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे शेवग्याच्या शेंगांचे भाव कमी झालेले नाहीत. फ्लॉवर, कोबी, मटार, फरसबीचे भाव वाढले होते. आता ते कमी झाल्याने ग्राहकांचा कल या भाज्यांकडे अधिक आहे. - रवी कुर्डेकर, भाजीविक्रेता
महागलेली तूरडाळ कमी झाली असली, तरी तेलाची आवक घटल्याने तेलाचे दर आता सातत्याने वाढत आहेत. - मयूर तन्ना, किराणा दुकानदार
एकीकडे भाज्यांनी दिलासा दिला असला, तरी तेलाच्या वाढत्या दराने मात्र खिशाला कात्री लावली आहे. - विद्या जाधव, ग्राहक