ठाणे : खेळाडूंसाठी पुण्यातील क्रीडांगणे खुली झाली, ठाण्यातील कधी होणार, असा प्रश्न प्रशिक्षकांसह ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेने केला आहे. कोरोनामुळे खेळाडूंचे अर्ध्यापेक्षा अधिक क्रीडा वर्ष वाया गेले असून याचा फटका राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीला बसणार असल्याने क्रीडांगणे लवकर सुरू करून त्यावर सराव करण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
क्रीडांगणे सुरू नसल्याने खेळाडूंच्या सरावाला मोठा ब्रेक बसला आहे. लॉकडाऊनच्या काळात विविध क्रीडांचे प्रशिक्षक आपापल्या खेळाडूंना ऑनलाइन प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे फिटनेस टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान खेळाडूंसमोर आहे. पुणे महापालिकेने मैदानी खेळांसह इनडोअर खेळांना नियम-अटींसह क्रीडांगणांवर सराव करण्याची परवानगी दिली आहे. इतर राज्यांतही क्रीडासराव सुरू झाला आहे. ठाण्यातही महापालिकेने लवकरात लवकर क्रीडांगणे सुरु करण्याची मागणी खेळाडूंकडून हाेत आहे.
आज ठाण्यामध्ये मैदानी खेळाडूंसाठी (ॲॅथलेटिक्स) सरावाच्या क्रीडांगणांची वानवा आहे. महापालिकेने दादोजी कोंडदेव स्टेडियमवर स्टॅण्डमध्ये सरावमार्गिका करून दिली आहे. ती जरी अपुरी असली तरी तिचा जास्तीतजास्त उपयोग धावपटू करीत असतात. परंतु, ती सुविधाही उपलब्ध नाही. - प्रमोद कुळकर्णी, उपाध्यक्ष, ठाणे जिल्हा अँथलेटिक्स संघटना
ठाणे आणि मुंबईमधील खेळांची मैदाने बंदच आहेत आणि खेळाडू आता वैतागले आहेत. व्यावसायिक खेळाडूंनी याबाबतीत पाठपुरावा करायचे ठरवले आहे, परंतु त्याला फारसा प्रतिसाद शासनाकडून मिळालेला नाही. - समीर सरळकर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, टेबल टेनिस
मुलांना आता मैदानावर पुन्हा येताना त्रास होईल. काही मुलांना शून्यापासून करावी लागेल. अर्धे क्रीडा वर्ष तर निघून गेले आहे. आता क्रीडांगणे सरावासाठी खुली करण्याची गरज आहे. - दर्शन भोईर, क्रिकेट प्रशिक्षक