लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : इराणीपाडा, अंबिवली (ता. कल्याण, जि. ठाणे) येथून पंजाबच्या लुधियाना पोलीस आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक ने केलेल्या संयुक्त कारवाईतून फय्याज मुमताज इराणी उर्फ बुलडोझर (५५) या कुख्यात गुन्हेगाराला मंगळवारी अटक केली. त्याने पोलीस असल्याची बतावणी करून पंजाबमधील नागरिकांना १५ ते २० लाखांना गंडा घातल्याची माहिती सूत्रांनी दिली.उंच धिप्पाड शरीरयष्टीच्या या बुलडोझरने लुधियाना पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अनेकांची फसवणूक केली. काहींना तो बोलण्यात गुंतवून दागिने आणि पैसे काढून ठेवण्यास सांगायचा तर काहींना पोलीस असल्याची बतावणी करून झडती घेण्याच्या नावाखाली दागिने लुबाडायचा. असे त्याच्याविरुद्ध आठ ते दहा गुन्हे दाखल होते. यामध्ये त्याने तीन ते चार साथीदारांच्या मदतीने १५ ते २० लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले. पंजाबमध्ये फसवणुकीचे प्रकार केल्यानंतर तो थेट अंबिवलीत वास्तव्याला येत होता. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे पंजाब पोलीसही हैराण झाले होते. त्याचे सीसीटीव्ही फुटेज लुधियाना पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अंबिवलीच्या इराणीपाड्यात कारवाई करण्यासाठी मदतीची मागणी केली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, अविराज कु-हाडे, समीर अहिरराव, उपनिरीक्षक सरक आणि पोलीस हवालदार सुभाष मोरे यांच्यासह लुधियानाच्या १५ पोलिसांची टीम आदींनी संयुक्तपणे १६ आॅक्टोंबर रोजी इराणीपाड्यात कारवाई केली. या कारवाईत त्याला अटक केल्यानंतर १७ आॅक्टोबर रोजी कल्याण न्यायालयाने त्याला चार दिवसांची ट्रान्सिस्ट कस्टडी (ठाणे ते पंजाब दरम्यान प्रवासासाठी ताबा) पंजाब पोलिसांना दिली. त्याच्याकडून आणखी बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पंजाबमध्ये २० लाखांना गंडा घालणाऱ्या ुइराणी ‘बुलडोझर’ ला अंबिवलीतून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 9:19 PM
कल्याणच्या इराणीपाडयामध्ये ठाणे आणि पंजाब पोलिसांनी संयुक्तरित्या कोंबिग आॅपरेशन राबवून फय्याज इराणी उर्फ बुलडोझर याला नुकतीच अटक केली आहे. पोलीस असल्याची बतावणी करीत त्याने पंजाबमध्ये अनेकांना गंडा घातला.
ठळक मुद्देलुधियाना पोलिसांसह ठाणे गुन्हे शाखेची कारवाईअनेकांची केली फसवणूकइराणीपाडयात कोंबिग आॅपरेशन