- जितेंद्र कालेकरठाणे : दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन ठाण्यात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष गस्ती पथके तैनात केली आहेत. महिलांची छेडछाड तसेच जबरी चोºयांना प्रतिबंध घालण्यासाठी ही पथके पायीदेखील गस्त घालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे पश्चिम प्रादेशिक विभागातील ठाणे शहर, वागळे इस्टेट आणि भिवंडी या तीन परिमंडळांतील वेगवेगळ्या मार्केटमध्ये ३ ते ८ नोव्हेंबर या सहा दिवसांच्या काळात कपडे, फराळाचे पदार्थ, किराणा आणि फटाके तसेच इतर खरेदीसाठी मोठी गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील जांभळीनाका, टेंभीनाका, कळवा, इंदिरानगर, लोकमान्यनगर, मुंब्रा तसेच भिवंडीतील धामणकरनाका, तीनबत्ती आणि मंडई या मुख्य बाजारपेठांमध्ये सोनसाखळी जबरीचोरी, पाकीटमारी, मोबाइलचोरीच्या घटना होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी या सर्वच ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांच्या पातळीवर साध्या वेशातील तसेच वर्दीवरील पोलिसांची पथकेही तैनात केली आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास या पथकातील अधिकारी, कर्मचारी यांची निगराणी राहणार असून ते नागरिकांच्या मदतीसाठी धाव घेतील, अशी माहिती ठाण्याचे अपर पोलीस आयुक्त केशव पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. सुटीच्या दिवशी सायंकाळी ४ ते रात्री ९ या काळात ही गस्ती पथके पायीदेखील गस्त घालणार असून सराईत गुन्हेगारांवरही त्यांची नजर राहणार आहे. गर्दीच्या वेळी नेहमीपेक्षा अतिरिक्त बंदोबस्त नेमल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.दिवाळीनिमित्त मोठ्या बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन जबरी चोरी, पाकीटमारी आणि छेडछाडीचेही प्रकार घडण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये मोक्याच्या ठिकाणी पोलिसांची साध्या वेशातही गस्ती पथके नेमली आहेत.- केशव पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर
पोलीस बंदोबस्तात होणार ठाणेकरांची दिवाळी खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 12:04 AM