कल्याण : दिवाळीपूर्वीच्या अखेरच्या रविवारी कल्याण-डोंबिवलीत खरेदीची एकच झुंबड उडाली होती. या खरेदीचा फटका वाहतुकीला दिवसभर बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. कल्याणला आग्रा रोडवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. अर्धा ते पाऊण तास कोंडीत एकाच जागी अडकून पडल्याने वाहनचालकांचे हाल झाले. वाहतूक पोलिसांचीही ही कोंडी सोडविताना पुरती कसरत झाली. काही भागात नागरिकांनीही रस्त्यावर उतरत ही कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेतला.डोंबिवलीतही मानपाडा रोड, फडके रोड, राथ रस्ता, टंडन रोड, राजेंद्रप्रसाद रोडवर वाहतुकीची कोंडी झाली होती. दुकानांनी दिवाळीनिमित्त व्यापलेली जादा जागा, फेरीवाल्यांनी व्यापलेले रस्ते, खरेदीसाठी उतरलेले नागरिक, त्यांनी कसेही केलेले पार्किंग आणि रस्त्यावरील वाहनचालकांनी अजिबात संयम न दाखवता क्षेणात गाड्या घुसवल्याने कोंडी वाढत गेली. त्यातही समोर कोंडी दिसत असूनही क्षणाचा विलंब न लावला सतत हॉर्नवर हात ठेवून त्याचा कर्कश आवाज करण्याच्या वृत्तीमुळे कोंडीच्या ठिकाणी कोलाहल अधिक होता.परतीच्या पावसाने नागरीकांच्या दिवाळी खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरले. सायंकाळच्या सुमारास हजेरी लावणाºया पावसाने सकाळी हजेरी लावल्याने दिवाळीपूर्वीच्या रविवारी कल्याण-डोंबिवलीत दुपारी खरेदीची झुंबड पाहावयास मिळाली. सहजानंद चौक ते शिवाजी चौक ही खरेदीची केंद्रे असल्याने याठिकाणी एकच गर्दी उसळली होती. यात खरेदीला येणाºयांनी त्यांची वाहने रस्त्याच्या दुतर्फा कशीही पार्क केल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसला. यात पत्रीपुल, वल्लीपीर चौक, शिवाजी चौक, सहजानंद चौक, लालचौकी या भागातील वाहतूक पूर्णत: खोळंबली होती. अर्धा ते पाऊण तास वाहने एकाच जागी उभी राहिल्याने याचा फटका अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीलाही बसला होता.नागरिकांमुळे कोंडी झाल्याने काही नागरिकांनीच पुढाकार घेत ही कोंडी फोडण्यास वेळोवेळी सहकार्य केले. दिवाळीपूर्वीचा रविवार असल्याने सायंकाळच्या सुमारासही हे कोंडीचे चित्र कायम होते. त्यात रूग्णवाहिका अडकून पडल्याचे दिसून आले. सहसा सणांच्या खरेदीच्या वेळी शिवाजी चौक ते महम्मदअली चौक येथे मोठया प्रमाणावर झुंबड उठत असल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद करून ती इतरत्र वळवली जाते. परंतू दुपारपर्यंत हा मार्ग बंद करण्यात आला नव्हता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वाहतूक शाखेच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी दिवाळीच्या खरेदीमुळे वाहतूक कोंडी उद््भवली असल्याचे सांगितले. तसेच ही कोंडी कायम राहिली, तर महम्मदअली चौकमार्गे शिवाजी चौकाकडे होणारी वाहतूक बंद करावी लागेल, असे स्पष्ट केले.
खरेदीचा उत्साह ‘वाहतुकीच्या’ मुळावर! वातावरणात आल्हाददायी गारवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 6:42 AM