ठाणे : ठाण्याच्या नियोजित विकास आराखड्यास येत्या २०२३ मध्ये २० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या अनुषंगाने आता महापालिकेने शहराच्या डीपी अर्थात विकास आराखड्याचे नव्याने सर्वेक्षण करण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये मंजूर विकास योजनेच्या फेरतपासणीकामी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ मधील तरतुदीच्या अनुषंगाने कायदेशीर कार्यवाही करून महापालिका क्षेत्राचे नव्याने सर्वेक्षण करणे व विद्यमान वापर नकाशा तयार करणे, तसेच शहरासाठी नियोजन प्रमाणके निश्चित करून पुढील वाढीव लोकसंख्येच्या अनुषंगाने विकास योजना सुधारित करून ती शासनाकडे मंजुरीसाठी पाठविली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या १८ सप्टेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवणार आहे.
शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार जीआयएस पद्धतीचा अवलंबही यात केला जाणार आहे. हे काम करण्यासाठी शासनाच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. महापालिकेची १ आॅक्टोबर १९८२ रोजी ३२ महसुली गावांचा आणि नगरपालिकेचा अंतर्भाव करून स्थापना झाली. ठाण्याच्या पूर्व-पश्चिम भागांत खाडीचे क्षेत्र आहे. पश्चिमेकडील भागात जुनी महापालिका हद्द आणि वागळे इस्टेट येथील एमआयडीसी क्षेत्र आहे. तसेच विकसनशील घोडबंदरचा भाग आहे. तर, पूर्वेकडील भागात कळवा, दिव्यापर्यंतचा भाग येतो. त्यानुसार, ४ आॅक्टोबर १९९९ रोजी शासनाने त्याच्या काही भागास मंजुरी दिली असून २२ नोव्हेंबर १९९९ पासून तो अमलात आला आहे. तसेच सुधारित विकास योजनेतील वगळलेल्या क्षेत्रासाठी ३ एप्रिल २००३ अन्वये विकास योजना मंजूर झाली असून ती १४ मे २००३ पासून अमलात आली आहे.
च्आता विकास योजना ज्या दिनांकापासून अमलात आली असेल, तेव्हापासून २० वर्षांत निदान एकदा आणि विकास योजनेच्या काही भागांना मंजुरी दिली असेल, त्या दिनांकाचा शेवटचा भाग अमलात आला असेल, तेव्हापासून किमान एकदा त्या क्षेत्राचे नव्याने सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. च्त्यानुसार, ते केल्यास सध्याचा जमीन वापर नकाशा तयार केला जाईल व त्यानंतर विकास योजनेची संपूर्णपणे किंवा तिच्या भागांची फेरतपासणी करू शकणार आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाकडून निर्देश आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.