बिर्लागेट : ऐन ग्रामपंचायत निवडणुकांच्या तोंडावर म्हारळ, वरप, कांबा या कल्याण तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतींतून गावातील मंडळींनी आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना मोठा धक्का मानला जातो. म्हारळ, वरप, कांबा ही तीन गावे शिवसेनेचा बालेकिल्ला मानली जात होती. मात्र, त्याला सुरुंग लावण्याचे काम भाजपाने ऐन निवडणुकीत केले. म्हारळ येथील शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार सुमन खरात, सदस्य नाथा गायकवाड, महेश खोत याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हारळचे माजी सरपंच प्रमोद देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, जितू देशमुख, सुनील देशमुख, बंजारा समाजाचे अध्यक्ष उत्तम म्हस्के, तर वरप गावातून राजेश भोईर, अजित पाटील, वासुदेव भोईर, उमेश म्हसकर आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याप्रसंगी भाजपाचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष महेश सुखरामाणी, सुनील पाटील, मधुकर मोहके, डॉ. भगवान भोईर, सरपंच महेश बनकरी, लक्ष्मण कोंगिरे आदी मंडळी उपस्थित होती. (वार्ताहर)
तिन्ही गावांतून सेना, राष्ट्रवादीला धक्का
By admin | Published: October 13, 2015 1:54 AM