ठाणे : ठाणे महापालिकेने प्रसिध्द केलेल्या पर्यावरण अहवालात हवेची गुणवत्ता सुधारल्याचा दावा करण्यात आला आहे. शहरातील ३६ पैकी १८ तलावांच्या पाण्याची गुणवत्ता सुधारली असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. नियमितपणे करण्यात येणाऱ्या एरिएशन आणि प्रिबायोमेट्रिक ट्रीटमेंटमुळे या १८ तलावांच्या पाण्याची गुणवत्ता वाढल्याचा दावा यात करण्यात आला आहे.ठाणे शहरात आजच्या घडीला ३६ तलाव आहेत. त्यातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच तलावांची अवस्था चांगली आहे. जवळपास ४० हेक्टरचा परिसर तलावांनी व्यापला आहे. शहरातील अनेक तलाव हे अतिक्र मणाच्या विळख्यात सापडले असून या तलावांना अतिक्र मणमुक्त करण्यासाठी पालिकेचे प्रयत्नदेखील सुरु आहेत. तलावांमध्ये काही प्रमाणात प्रदूषण झाल्याने तलावातील पाण्याच्या गुणवत्तेवरदेखील प्रश्चचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे तलावांच्या प्रदूषणाबाबत पर्यावरण तज्ञांच्यावतीनेदेखील अनेकवेळा मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. ठाणे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालामधून मात्र तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तलावांच्या पाण्यामधील महत्वाचा घटक असलेल्या बायोलॉजिकल आॅक्सीजनची पातळी तपासण्यात आली. अशा प्रकारे २४ तलांवाच्या पाण्याची तपासणी करण्यात आल्यानंतर २४ तलावांपैकी १८ तलावांमध्ये बीओडीची पातळी चांगली असल्याचे निष्पन्न झाले आहे. तलावांमध्ये असलेल्या जैवविविधतेसाठी ही चांगली गोष्ट आहे. गुणवत्ता वाढलेल्या तलावांमध्ये फडकेपाडा तलाव, खारेगांव, मासुंदा, ब्रम्हाळा, जेल तलाव, उपवन आणि शवाजी नगर यांचा समावेश आहे.विशेष दक्षतापाण्याची गुणवत्ता वाढण्यामध्ये या तलावांमध्ये नियमतिपणे करण्यात येणारी एरिएशन आणि प्रिबायोमेट्रिक ट्रीटमेंटप्रक्रिया हे प्रमुख कारण आहे. सिव्हरेजचे पाणी तलावांमध्ये जाऊ नये याचीही विशेष दक्षता घेतली गेली असल्याने ही सुधारणा झाली असल्याचे ठाणे महापालिकेच्या प्रदूषण विभागाचे म्हणणे आहे.
शहरातील १८ तलावांच्या पाण्याची गुणवत्ता सुधारली, पालिकेचा अहवाल प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 4:12 AM