ठाणे : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आता रुग्णांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी कोविड रुग्णालये उभारत आहे. कोविड रुग्णालयासाठी ठाणे महापालिकेने मंगळवारी विद्या प्रसारक मंडळाचे जोशी-बेडेकर महाविद्यालय ताब्यात घेतले. केवळ २४ तास आधी महाविद्यालयाचा परिसर अधिग्रहण करीत असल्याचे पत्राद्वारे सांगून मंगळवारी दुपारी महाविद्यालयाचा थेट ताबा घेणे हे अतिशय चुकीचे आहे. कोणतीही विनंती किंवा चर्चा न करता अशा प्रकारे थेट ताबा घेणे, हा देशातला कोणता कायदा आहे, अशा शब्दांत विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तर आम्ही क्वारंटाइन सेंटरसाठी महाविद्यालय ताब्यात घेतल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रभाग समितीनिहाय शाळा, महाविद्यालये किंवा सभागृह क्वारंटाइन सेंटरसाठी ताब्यात घेण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. त्यानुसार विद्याप्रसारक मंडळाला जोशी-बेडेकर महाविद्यालय कोविड रुग्णांसाठी ताब्यात घेणार असल्याचे सोमवारी महापालिकेने पत्राद्वारे कळवले. मंगळवारी दुपारी पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाचा ताबा घेतला. या वेळी महाविद्यालयात शिक्षक उत्तरपत्रिका तपासणीचे काम करीत होते, तसेच महाविद्यालयांचे प्राचार्यही होते. प्राचार्यांनी महापालिका अधिकाºयांना काही काळ थांबून चर्चा करण्याची विनंती केली, मात्र त्यांनी कोणतीही चर्चा न करता कायद्यानुसार आम्ही महाविद्यालय आणि संपूर्ण परिसर ताब्यात घेतला आहे, असे सांगितले. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर हा जर कायदा असेल तर देशातला कोणता कायदा आहे? की जिथे साधी विचारणाही होत नाही. शहरात इतरही विविध ठिकाणे असताना शैक्षणिक संस्था कोविड रुग्णांसाठी वापरणे कितपत योग्य आहे. विद्यापीठाने आम्हाला आॅनलाइन शिक्षण सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असे असताना महाविद्यालयाचा ताबा घेणे चुकीचे आहे, असे मत डॉ. बेडेकर यांनी व्यक्त केले. महापालिकेने कायद्यानुसार महाविद्यालय क्वारंटाइन सेंटर म्हणून ताब्यात घेतले आहे आणि तसे महाविद्यालयाला कळविले आहे, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.आमची नामांकित शिक्षणसंस्था आहे. महाविद्यालयात आजघडीला करोडो रुपयांची मालमत्ता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही पूर्ण काळजी घेऊनच काम करीत आहोत किंवा शासनाला सहकार्य करतो. परंतु, आता अशाप्रकारे महाविद्यालय कोरोना रुग्णांसाठी कोणतीही चर्चा न करता महापालिकेने ताब्यात घेणे चुकीचे आहे. आमच्या महाविद्यालयात येणारे शिक्षक, कर्मचारी यांच्या आरोग्याचादेखील प्रश्न उद्भवतो.- डॉ. विजय बेडेकर, कार्याध्यक्ष, विद्या प्रसारक मंडळ.कोरोनामुळे चार जणांचा मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण/भिवंडी : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृतांची संख्या ४६ झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये ठाकुर्ली पूर्वेतील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्याचबरोबर कल्याण पश्चिमेतील टिळक चौकातील ६८ वर्षीय पुरुष, सुभाष मैदान परिसरातील ६७ वर्षीय पुरुष आणि कल्याण पूर्वेतील होमबाबा टेकडी परिसरातील ४६ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. मंगळवारी कोरोनाचे नवे ७२ रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,५६२ झाली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६७३ आहे. उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८४३ आहे.भिवंडीत ५३ नवे रुग्णभिवंडीत मंगळवारी ४२ रुग्ण आढळले. तर ग्रामीण भागात ११ रुग्ण आढळले असून काल्हेर येथील ३४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. मंगळवारी ग्रामीण भागात व शहरात एकूण ५३ नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत ३२६ रुग्ण आढळले असून त्यापैकी १३३ बरे झाले आहेत. आतापर्यंत २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून १७२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात ७७ रुग्ण बरे झाले आहेत तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.