ठाणे : ठाण्यात एखाद्या भागात रुग्ण आढळला की त्याच्या संपर्कात येणाऱ्यांना घोडबंदर भागातील कासारवडली आणि भार्इंदरपाडा येथे क्वॉरन्टाइन केले जात आहे. परंतु, आता या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्तीचे नागरिक क्वॉरन्टाइन केले असल्याचा धक्कादायक आरोप नगरसेवकांनी केला आहे. शिवाय त्या ठिकाणी पाण्याचे बाटले भरून ठेवले आहेत, त्यामुळे दुसऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जास्तीतजास्त पाणी पिण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले असले तरी येथे मात्र अवघ्या एक लीटर पाण्याच्या बाटलीवर दोन दिवस काढावे लागत असून जेवणीचही आबाळ सुरूआहे. रुग्णांची तपासणीदेखील वेळेवर होत नसल्याचे आरोपही होऊ लागले आहेत.ठाण्यात कोरोनाबाधीतांच्या संख्येला आळा घालण्यात महापालिका प्रशासन आणि सिव्हील रुग्णालय प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र आहे. शहरात आजघडीला २३० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना महापालिका कासारवडली आणि भार्इंदरपाडा येथे क्वॉरंटाइन करीत आहे. त्यामुळे येथील संशयितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. याठिकाणी कोणत्याही स्वरूपाची पूर्तता वेळच्यावेळी होत नसल्यामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत. एकीकडे उन्हामुळे सारखी तहान लागत असताना एक जणाला दोन दिवसांसाठी केवळ एकच पाण्याची बॉटल पुरविली जात आहे. त्यामुळे पाण्याविना संशयितांचे हाल होत आहेत. शिवाय काही ठिकाणी पाच पाच लीटरचा बाटली ठेवले असून त्यातूनच येथील सर्वांना पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे यातून कोरोना वाढणार की कमी होणार असा सवालही केला जात आहे. जेवण वेळेवर मिळत नाही. तेही आम्ही मान्य करू. परंतु, एखाद्याला जास्तीचा त्रास सुरूझाला तरीदेखील त्याची तातडीने तपासणी केली जात नसून संशयितांनादेखील उपचारासाठी ताटकळत राहावे लागत असल्याची माहिती येथील क्वॉरंटाइन झालेल्या संशयितांनी दिली आहे. तपासणी वेळवर होत नसल्याने आजाराचे निदान वेळेत नाही, त्यामुळे एखादा कोरोनाची लक्षणे दिसणारा नागरिक इतरांच्याही संपर्कात येऊन रुग्णांच्या संख्येत एकप्रकारे भरच पडत आहे.>खासगी रुग्णालयांकडूनरुग्णांची लूटदुसरीकडे क्षमतेपेक्षा जास्तीचे नागरिक येथे ठेवल्याचा आरोप राष्टÑवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना सोयीसुविधाही वेळेत मिळत नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात जगदाळे यांनी थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्रव्यवहार केला असून याची दखल घेण्याची मागणी केली आहे.अन्यथा, कोरोनाच्या रुग्णसंख्येत आणखी वाढ होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीदेखील शासनाला व्हिडीओद्वारे विनंती केली असून शक्यतोवर शासकीय रुग्णालयात रुग्णांवर उपचार करावेत, अशी मागणी केली आहे. खाजगी रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी गेल्यास त्याचे बिल हे दीड ते दोन लाख जात आहे. ते भरणेही लॉकडाउनमुळे शक्य होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. कमाईचे साधन नसल्याने एखाद्या रुग्णाने एवढे महागडे बिल कसे भरायचे, असा सवाल त्यांनी केला असून आता ही एकप्रकारची लूट असून यातही भ्रष्टाचार सुरूझाला की काय, अशी शक्यताही निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
क्वारंटाइन केलेल्यांचे हाल संपता संपेनात, क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 1:54 AM