भिवंडी : ठाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या वाहन चालकास पाच जणांच्या टोळीने अडवून त्यास रॅाडने मारहाण करून, त्याच्याकडील रक्कम व मोबाइल चोरी केल्याची घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील हायवे दिवा पेट्रोल पंपासमोर २९ जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी वाहन चालक अमोल सुरेश एडके (२७) याने नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी अंजूर, आलीमघर, भरोडी येथून चार जणांना शुक्रवारी अटक केली. त्यांचा एक साथीदार अजूनही फरार आहे.
जयेश संतोष पाटील (२२), जय मनोहर पाटील, अजय पाटील, हरिश पाटील यांना अटक केली आहे. तपासात त्यांच्याकडून दरोड्यातील ऐवजही जप्त करण्यात आल्याची माहिती नारपोली पोलिसांनी दिली आहे. हा तपास भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर.जे. व्हरकाटे यांनी केला.