- अनिकेत घमंडीडोंबिवली - देशातील सर्वाधिक घाणेरड्या रेल्वे स्थानकांच्या यादीत कल्याण स्थानकाचा तिसरा क्रमांक लागला आहे. राज्यासह केंद्र सरकारने हागणदारी मुक्त ग्राम,शहर असा संकल्प सोडलेला असतांना कल्याण स्थानक मात्र त्यास अपवाद असल्याचे फलाट क्रमांक ४ ते ६ या ठिकाणी गेल्यावर प्रकर्षाने जाणवते. रेल्वेने प्रवासादरम्यान बायो टॉयलेट उपक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला असला तरी कल्याण स्थानकात मात्र ठिकठिकाणी उघड्यावर शौचाला बसणे यांमुळे प्रचंड बकाली, दुर्गंधी असल्याचे आढळून येते. यामुळेच स्थानकात सर्वत्रच माशा घोंगावतांना आढळून येत असल्याने या स्थानकातून दिवसाला २.५ लाख प्रवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अतिरेकी कारवायांमुळे आधीच रेल्वे स्थानके असुरक्षित असतांना आता त्यांच्या आरोग्य आणि स्वास्थावरही प्रश्नचिन्ह असल्याने प्रवासी नाराज आहेत.असुविधांसंदर्भात वेळोवेळी आवाज उठवूनही स्थानकात काही केल्या सुधारणा दिसून येत नाहीत, आणि बदल घडत नसल्याने प्रवासी नाराज असून केवळ नाईलाजाने प्रवास करत आहेत. लांबपल्याच्या प्रतीदिन सुमारे अडीचशेहून अधिक रेल्वे गाड्या या स्थानकातून ये-जा करतात. त्या गाड्यांंमधून लाखोंच्या संख्येने येणारे लोंढे स्थानकात बकाली करतात, त्या बकालीची सफाई करतांना स्थानकातील रेल्वेचे सफाई कामगार कमी पडतात, त्यामुळे ही भयंकर समस्या उभी राहीली आहे. उपनगरिय लोकल गाड्यांच्याही प्रतीदिन ८०० हून अधिक लोकल फे-या या स्थानकातून होतात. लांबपल्याच्या आणि लोकलच्या उत्तरेकडे नासिकमार्गे तर दक्षिणेकडे पुणे मार्गे जाणा-या गाड्यांमधून प्रवाशांची ये-जा अहोरात्र सुरु असते. पहाटे ४.३० वाजता मुंबईकडे जाणारी पहिली लोकल तर मध्यरात्री १२.१५ ते १२.३० च्या सुमारास कसारा जाणारी तर पहाटे २.१५ - २.३० च्या सुमारास कर्जत लोकलमधून शेकडो प्रवासी येथे उतरतात-चढतात. त्यामुळे दिवसंरात्र हे स्थानक प्रवाशांनी गजबजलेले असते.स्थानकात ७ फलाट असून त्यातील ४,५ आणि ६ या फलाटांमध्ये प्रामुख्याने लांबपल्याच्या गाड्या अप-डाऊन मार्गे धावतात. त्यासह १ ते ७ या फलाटांमध्ये उपनगरिय लोकल देखिल अप-डाऊन मार्गावर धावतात. १ आणि १ए या फलाटांमधून प्रामुख्याने कल्याण जंक्शनच्या लोकल मुंबईच्या दिशेने सुटतात. फलाट २ वरुन कसारा-कर्जत मार्गावर लोकल धावतात, ३ वरुन मुंबईसाठी, ४ डाऊनसाठी, ५ देखिल बहुतांशी वेळा डाऊन तसेच पहाटेच्या वेळी अप लांबपल्याच्या गाड्यांसाठी तर ६,७ अप मार्गावरील लोकल गाड्यांसाठी असतो असा ढोबळ मानाने प्रवास होतो. त्यात काहीवेळेस तांत्रिक बाबींमुळे बदल केले जातात. पण एकंदरीतच या स्थानकामध्ये अहोरात्र प्रवासी असतात, त्यामुळे स्वच्छतेसाठी विशेष यंत्रणा राबवूनही त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. फलाटात अवघे ३ स्वच्छतागृह असून अडीच लाख प्रवाशांसाठी ती अपुरी असल्याने आणि सगळयाच फलाटात ती सुविधा नसल्याने बहुतांशी वेळेला जागा मिळेल तिथे आडोसा घेत शौच करण्यात येते. त्यातच जी स्वच्छतागृहे आहेत तेथे प्रचंड वापरामुळे पुरेसे पाणी नसल्याने समस्या गंभीर होत आहे.फलाटांमध्ये भिकारी, गर्दूल्ले, भटकी कुत्रे यांचा मुक्त संचार असल्यानेही प्रवासी हैराण आहेत. पादचारी पूल, तिटिक घरांचा परिसर, स्थानकात पूर्व-पश्चिमेकडील परिसर यासर्व ठिकाणी जागा मिळेल तिथे ते पथारी मांडतात. त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नसल्याने त्यांचे घाण सामान तेथे पडलेले असते. फलाटात थुंकदाण्यांचा आभाव असल्याने वाट्टेल तिथे थुंकलेले आढळू येते. प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र अशी जरी राज्य सरकारने हाक दिलेली असली तरी या स्थानकात त्याचे सर्रास उल्लंघन केले जात असून कोणावरही त्याचा ताळमेळ, पायपोस नसल्याचे स्थानकात पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्यांवरुन स्पष्ट होते. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही, त्यामुळे महिलांची कुचंबणा होते. वासनाधीन उपद्रवींपासून आडोशाला जाणा-या महिलांना सुरक्षिततेची हमी नसल्याने त्यांची पंचाईत या स्थानकात होते. फलाट १ वर अशाच एका घटनेत अत्याचार झाल्याची घटना या स्थानकात पूर्वी घडलेली सर्वश्रुत आहे.स्थानकात तीन पादचारी पूल असून ते पुरेसे नाहीत, कल्याण दिशेकडील पूल अरुंद आहे, तसेच मुंबई दिशेकडील पूल जूना झाला असून डागडुजीची गरज आहे. मधला नवा एकमेव पूल सुस्थितीत असला तरी त्याचा वापर करतांना तांत्रिक अडचणी आहेत.वर्षानूवर्षे स्थानकाचा विस्तार झालेला नाही. त्यातच स्थानकात लोकल गाड्यांसह लांबपल्याच्या गाड्यांच्या थांब्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी स्थानिक प्रवासी जरी तेथे काही क्षणसाठी थांबत असला तरीही लांबपल्याच्या गाड्या पकडण्यासाठी आसनगाव, टिटवाळा, शहाड, वांगणी, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर-दिवा येथून लाखो प्रवासी येत असतात. ठाण्यानंतर कल्याण तर कसारा-कर्जत नंतर थेट कल्याण येथेच लांबपल्याच्या गाड्यांना थांबा असल्याने अशा प्रवाशांसाठी हे मध्यवर्ती जंक्शनचे ठिकाण आहे. बुतांशी प्रवासी लांबपल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रका आधीच तासनतास येथे ठाण मांडतात. त्यामुळे स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वाणिज्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार या स्थानकातून दिवसाला १ लाख तिकिटांची विक्रि होत असून ७० लाख रुपयांची उलाढाल होत असते. स्थानकात पूर्वेसह पश्चिमेला तिकिट आरक्षणाची सुविधा आहे, पश्चिमेच्या आरक्षण गृहात भटकी कुत्री, भिकारी, गर्दुल्ले यांसह रेंगाळलेल्या प्रवासी सतत तेथे आढळून येतात.* कल्याण रेल्वे स्थानकालगतच तालुक्याचे भाजी मार्केट आहे. त्या बाजारासाठी आसनगाव, शहापूर, बदलापूर, वांगणी, शेलू आदी भागातून व्यापारी येतात. बहुतांशी छोटे व्यापारी लोकलमधून स्थानकात येतात, कल्याण दिशेकडे उतरुन भाजी मार्केट गाठतात. अनेकदा रात्री उशिरापर्यंत त्यांना परतण्याचा पर्याय नसल्यास काही जण स्थानकात थांबतात. लांबपल्याचे प्रवासी अनेकदा गाडीची वाट बघत स्थानकात जागा मिळेल तिथे थांबतात. त्यामुळे वर्दळ कायम असल्याने पाणपोईची जागा, स्वच्छतागृहे, उपाहारगृहांचा परिसरात घाण आढळून येते.* पाण्याच्या, शितपेयांच्या बाटल्यांचा खच येथे दिसून येतो. ट्रॅकमध्ये टाकण्यात येणा-या खडींच्या बॅगा येथे टाकण्यात येतात. त्यातर अरुंद पादचारी पूल, अपुरा सफाई कर्मचारी वर्ग यांमुळे स्वच्छेता राखली जात नाही.* स्थानकालगतच पश्चिमेला रिक्षा स्टँड आहे, अडगळीच्या जागेत असलेले लोहमार्ग पोलीस ठाणे. त्यामुळे तेथे जातांना अनेकांना अडथळे येतात. एस्कलेटरची सुविधा असून नसल्यासारखी, तांत्रिक बिघाडामुळे ते बंद असल्यास प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. स्थानकात कुठेही कंपाऊंड वॉल नाही, त्यामुळे स्थानक परिसरातला कचरा देखिल सर्रासपणे टाकला जातो. तो नेमका उचलायचा कोणी, महापालिकेने की रेल्वेने? यामुळेही समस्या जैसे थे होते, घाणीत वाढ होतच जाते. पावसाळयाच्या दिवसांमध्ये बकालीत वाढ होते.* वातानुकूलीत डॉरमेटरीची सुविधा येथे उपलब्ध असली तरी त्यात अवघे ५० -७० प्रवासीच थांबू शकतात. त्यातही ते फलाट १ वर असल्याने प्रवासी येणे टाळतात. त्यामुळे ही सुविधा असली तरी प्रवाशांच्या पसंतीला फारशी उतरलेली नाही. * कल्याण स्थानकाला जंक्शनचा दर्जा आहे, पण या स्थानकात सुविधा नाहीत. लांबपल्याच्या गाड्या जेथे थांबतात त्या फलाटांवर बाकडी नाहीत की, पाणपोई नाही. वेटींग रुम तर नाहीच. प्रवाशांनी तिकिट काढूनही त्यांना अपु-या सुविधांवर समाधान मानावे लागते. - मंगेश सुर्यवंशी* लेडिज स्पेशल ही एकमेव लोकल कल्याण स्थानकातून सकाळच्या वेळेत सुटते, महिलांचे असंख्य प्रश्न आहेत. या स्थानकामध्ये महिलांसाठी विशेष सुविधा काय आहेत ते दाखवा. लाखो रुपयांची उलाढाल होत असूनही या स्थानकात सुविधांचे वावडे का? - किरण सिंग* या स्थानकातून लांबपल्याच्या आणि लोकल धावतात. त्यातून लाखो प्रवासी दिवसाला प्रवास करतात. पण हे स्थानक आहे की उकीरडा. जिथे बघाव तिथे बकाली. पाणपोई, स्वच्छतागृहे, फलाट, भिंतींसह पादचारी पूलावर बकाली, दुर्गंधीमुळे गाडीची वाट बघण्यासाठी उभे राहता येत नाही. - जान्हवी विशे* लहान मुलांची प्रचंड गैरसोय होते. मोठ्यांना नाईलाजाने प्रवास करावा लागतो, पण लहान मुलांना अस्वच्छतेमुळे कुठे बसवावे, काय खायला द्यावे हा मोठा प्रश्न असतो, त्यामुळे मोठी पंचाईत होते - जितेंद्र विशे* कल्याण स्थानकाचा बकालीमुळे देशात तिसरा क्रमांक आला ही शोकांतिकाच आहे. पण केवळ प्रशासन नव्हे तर प्रवाशांचीही ती जबाबदारी असून सगळयांनी मिळून ही समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा - कांचन खरे, मेंबर आॅफ झेडआरयूसीसी, कल्याण
कल्याण जंक्शन स्थानकातून प्रवास करणाऱ्या २.५ लाख प्रवाशांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 9:11 PM