- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील शांतीनगर येथील गुरुदेव एंटरप्राइजेस दुकानातून अन्न औषध व प्रशासन विभागाने सोमवारी सायंकाळी धाड टाकून गुजरात मधून आलेला ९०० किलोचा बनावट मावा जप्त केला. या कारवाईने मिठाईवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगरातील नामांकित मिठाईच्या दुकानातून बनावट माव्याच्या मिठाईची विक्री होत असल्याची चर्चा ऐन दिवाळीत होत असताना, सोमवारी सायंकाळी कॅम्प नं-३ शांतीनगर येथील गुरुदेव एंटरप्राइज दुकानावर अन्न औषध व प्रशासन विभागाच्या पथकाने धाड टाकली. यावेळी पथकाच्या चौकशीत प्लास्टिकच्या गोण्या मध्ये गुजरात मधून आलेला ९०० किलोचा मावा बनावट असल्याचे उघड झाले. माव्याच्या गोण्यावर कंपनीचे नाव, एक्सप्रायरी डेट, माव्या बाबत माहिती नसल्याने, सदर माव्याच्या गोण्या अन्न औषध व प्रशासन विभागाने ताब्यात घेतल्या असून त्यापैकी काही गोण्या तपासणीसाठी पाठविल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास अन्न औषध व प्रशासन विभागाचे पथक करीत आहेत.
शहरातील नेहरू चौक परिसरात मिठाईचे नामांकित दुकाने, नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टिकोनातून त्यांच्या मिठाईची तपासणी अन्न औषध व प्रशासन विभागाने करावी. अश्या मागणीने जोर धरू लागला आहे. याठिकाणी सुद्धा बनावट माव्यातून बनविलेली मिठाई विक्रीसाठी ठेवल्याची चर्चा शहरात रंगली आहे. त्यापैकी काही दुकानावर यापूर्वी कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.