लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे कॅम्प नं ५, शाळा क्रं २८ मधील कोरोना लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळून लांबच लांब रांगा लागत आहेत. ऑनलाईन व टोकन पद्धतीने लसीकरण सुरू असल्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली.
उल्हासनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, उपायुक्त मदन सोंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे, डॉ. राजा रिजवानी विविध उपक्रम राबवत आहेत. लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयटीआय कॉलेज इमारत व कॅम्प नं ५ येथील शाळा क्रं २८ मध्ये लसीकरण केंद्र सुरू केले. दररोज ४०० पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण या केंद्रात होत असल्याची माहिती डॉ. रिजवानी यांनी दिली. तसेच काही खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी महापालिकेने दिली आहे. मात्र लसींची संख्या अत्यंत कमी आहे. तर मध्यवर्ती रुग्णालयात लसीकरण सुरू असून रुग्णालयाला राज्य सरकारकडून लसीचा साठा देण्यात येतो. लसीकरण जास्तीत जास्त होण्यासाठी केंद्र वाढविण्याचे संकेत महापालिका आरोग्य विभागाने दिले आहेत.
शहर पूर्वेला एकमेव लसीकरण केंद्र असल्याने नागरिक येथे मोठ्या संख्येने गर्दी करत आहे. ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारातून लसीकरण सुरू असून नागरिक सकाळी सहा वाजल्यापासून केंद्रावर रांगा लावत आहेत. नागरिकांच्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे. केंद्रावर नागरिकांना बसण्याची व पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा नसून पॅरासिटेमॉलच्या गोळ्याही दिल्या जात नाही. तसेच लसीकरण केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना लसीबाबत प्राथमिक माहिती दिली जात नसल्याने बहुतांश नागरिक लसीबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसते.
लसीकरण केंद्र नव्हेतर संसर्ग केंद्र?
महापालिकेच्या लसीकरण केंद्रावरील नागरिकांची गर्दी बघता हे लसीकरण केंद्र नव्हे तर कोरोना संसर्ग केंद्र असल्याची टीका मनसेकडून होत आहे. जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळण्यासाठी लसीकरण केंद्र प्रत्येक कॅम्पमध्ये सुरू करण्याची मागणी मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केली आहे.