डोंबिवली : महापालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून लसींचा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरण केंद्रे वारंवार बंद ठेवावी लागत आहेत. त्यामुळे उद्यावर अवलंबून न राहता आजच लस मिळावी या प्रयत्नात नागरिक आहेत. साठा उपलब्ध झाल्याचा संदेश व्हायरल होताच नागरिक टोकन घेण्यासाठी मध्यरात्रीपासूनच केंद्रांबाहेर रांगा लावत आहेत. सोमवारी बहुतांश ठिकाणी लसीचा दुसरा डोस देण्याचे नियोजन करण्यात आले होते.
लसीसाठी तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही लसीकरण केंद्राबाहेर ताटकळत आहेत. नागरिक जास्त येत असल्याने टोकन कमी पडू लागले आहेत. रात्री रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य यानुसार टोकन मिळाले. मात्र सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास केंद्रांवर जाणाऱ्या नागरिकांना माघारी जावे लागत आहे. ज्यांना टोकन नाही मिळाले, त्या ठिकाणी शाब्दिक चकमकीचे प्रकारही वाढले आहेत. महिनाभरापूर्वी इस्पितळात बेड, ऑक्सिजन, औषध यासाठी करावी लागणारी धावपळ आता लसीकरणावर येऊन ठेपली आहे. नागरिकांना जास्त वेळ बसून ठेवण्यापेक्षा टोकन देऊन त्या त्या वेळेनुसार लसीकरण करण्याकडे काही केंद्रांचा कल आहे.
गेल्या दोन आठवड्यांत लसीकरणाला वारंवार ब्रेक लागत असल्याने केंद्रांवर गर्दी होत आहे. लस उपलब्ध होईल की नाही, याचा भरवसा नसल्याने नागरिक टोकनसाठी रात्रीपासूनच रांगा लावत आहेत. डोंबिवलीतील शिवमंदिराजवळील शाळेतील केंद्रावर सोमवारी टोकनमुळे काही काळ गोंधळ उडाला होता. या ठिकाणी काही नागरिक रात्री १ वाजल्यापासून रांगेत उभे होते. काहींना रात्री तर काहींना सकाळी टोकन दिल्याची टीका काही नागरिकांनी केली. टोकन नेमकं देतात तरी कधी, असा सवालही उपस्थित करण्यात आला. टिळकनगरच्या केंद्रावरही अशीच स्थिती होती. येथे एकूण ३०० नागरिकांसाठी लस होती. त्यापैकी काही दिवसांपासून वेटिंगवर असलेल्या २९८ जणांना बोलावण्यात आले. उर्वरित अवघ्या दोन डोससाठी आयोजकांना नागरिकांनी भंडावून सोडल्याचे निदर्शनास आले.
--
आम्ही केंद्रावर नागरिकांना नेहमी मदत करतो. मात्र लस उपलब्ध होते, तेव्हा सकाळी ६ ते ७ या वेळेतच टोकन वाटले जाते. अलीकडे साठा कमी असल्याने लस मिळते की नाही, या विवंचनेत नागरिक रात्रीपासूनच टोकनसाठी रांगा लावत आहेत.
- सागर जेधे, शिवसेना पदाधिकारी
-----------
बरेच दिवसांनी लस आली. त्यात जे आधीपासून रांग लावून माघारी गेले त्यांना आम्ही प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर बोलावले. जे वेळेवर आले त्यांना परत पाठवण्याशिवाय पर्याय नव्हता. महापालिका प्रशासनाने जास्तीच्या लस उपलब्ध करून द्यायला हव्यात.
- राजन आभाळे, माजी नगरसेवक, टिळकनगर, भाजप