ठाणे : पोलीस नियम का पाळत नाहीत. कोपरीत बसविरोधी आंदोलन करूनही वाहतूककोंडी आजही जाणवते. कंपनीच्या नावाखाली अवैध वाहतूक करणाºया बसेसवर कारवाई का होत नाही. नो-पार्किंगचा बोर्ड नसूनही त्या ठिकाणी वाहन पार्क केल्यावर त्या वाहनांवर वाहतूक विभाग कारवाई कशी काय करू शकतो, अशा शेकडो प्रश्नांची सरबत्ती वाहतूक विभागाचे उपायुक्त अमित काळे यांच्यावर शनिवारी ठाणेकरांनी केली.मुंबईत पोलीस कारवाई करतात, तेव्हा त्यांच्या कारवाईत कोणाचाही हस्तक्षेप नसतो. माझ्या विभागातील अधिकारी-कर्मचाºयांना कारवाई करताना कोणाचाही फोन घेऊ नका, अगदी माझा असेल तरी घेऊ नका, अशा सूचना दिल्या आहेत, असे सांगत ठाण्यातील राजकीय हस्तक्षेपावर वाहतुकीच्या बेशिस्तीचे खापर फोडले.‘समन्वय प्रतिष्ठान’तर्फे शनिवारी मराठी ग्रंथसंग्रहालय येथे ‘ठाणे वाहतूककोंडी समस्या व उपाय...’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन केले होते. या वेळी ठाणेकरांनी प्रश्नांचा पाऊस पाडला. या पदाचा कार्यभार स्वीकारून आपल्याला जेमतेम चार दिवस झाले आहेत, असे सांगत काळे यांनी आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करून पाहिला. मात्र, आपल्या कार्यकाळात ‘वाहतूककोंडीमुक्त ठाणे’ करण्याचे आश्वासन काळे यांनी दिले.कोपरी येथे ठाणेकरवाडीपर्यंत रस्त्यांवर, फुटपाथवर वाहने उभी राहतात, त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असे विलास निकम यांनी विचारले. नो-पार्किंगमध्ये सर्व वाहने उभी असतात, नो-एण्ट्रीमधून सर्रास गाड्या जातात, हा मुद्दा बाळकृष्ण पणीकर यांनी मांडला. कोपरीत येणाºया कंपनीच्या बसेसमधून अवैध वाहतूक चालते. त्यांची तपासणी करा, अशी मागणी राजेश गाडे यांनी केली. कोपरी ब्रिजवर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत प्रचंड वाहतूक असते. याकडे हेमंत पाटील यांनी लक्ष वेधले. ज्ञानेश पाटील यांनी पार्किंगसाठी २७ भूखंड फक्त कागदावर आहेत असे ताशेरे ओढले.उपायुक्त काळे म्हणाले की, मुंबईत वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा जसा धाक आहे, तसा ठाण्यातील वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा नसल्याचे निदर्शनास आले आहे. ठाणेकर मुंबईत गेल्यावर नियम पाळतात, पण ठाण्यात पाळत नाही. मुंबईत पोलीस कारवाई करतात, तेव्हा त्यांच्या कारवाईत कोणाचाही हस्तक्षेप नसतो. जी भीती टोलनाक्यापलीकडे आहे, ती अलीकडे नाही, असे स्पष्टपणे सांगताना त्यांनी वाहतूक विभागाकडून ई-चॅनल सिस्टीम सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच, कारवाईमध्ये वाहनचालकाकडून परवाना जप्त केल्यास त्याची माहिती सर्व आरटीओ कार्यालयात दिली जाईल, जेणेकरून परवाना हरवल्याची खोटी माहिती देऊन दुसरा वाहन परवाना तो वाहनचालक घेऊ शकणार नाही. समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. अॅड. निरंजन डावखरे यांनी प्रास्ताविक केले. (संबंधित वृत्त पान ३)नागरिकांच्या ज्वलंत विषयावरील समस्या ऐकण्यासाठी महापालिकेचे अधिकारी गैरहजर राहिल्याने नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. महापालिकेच्या वतीने किमान एक अधिकारी उपस्थित राहू शकत नाही का, असा सवाल उपस्थित केला.वाहतूक विभागाचे अधिकारी वेळेत न आल्याने नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. अधिकारी वाहतूककोंडीत अडकल्याने येण्यास थोडा उशीर होईल, असे व्यासपीठावरून सांगितल्यानंतर आम्ही पण वाहतूककोंडीतून आलो आहोत. त्यांना जास्त उशीर झाला, तर बाहेरच थांबवा, अशा शब्दांत कळवास्थित मधुकर झेमसे यांनी आपला रोष व्यक्त केला. काही ज्येष्ठ नागरिकांचा संताप इतका अनावर झाला होता की, ते सारखे तावातावाने बोलत व्यासपीठाकडे धाव घेत होते.
राजकीय हस्तक्षेपामुळे वाहतुकीचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 2:30 AM