ठाणे : कळव्यातील आतकोनेश्वर नगर भागात कोरोना लसीकरण सुरु असतांना एका व्यक्तीला कोरोना लसी ऐवजी रेबीज लस दिली गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर मंगळवारी दुपारी महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेच्या वतीने येथील डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई केली आहे.
ठाणे महापालिका मागील काही महिन्यापासून या ना त्या कारणाने चर्चेत आहे. दोन महिन्यापूर्वी एका महिलेला एकाच वेळेस कोरोना लसीचे तीन डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर कोरोनाची दुसरी लस घेतली नसतांना एका जेष्ठ नागरीकाला दुसरी लस घेतल्याचा मेसेज मोबाइलवर आला होता. तसेच लसीकरणातही भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप करीत भाजपने पालिकेवर टिका केली होती.
दरम्यान या घटना ताज्या असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. कळव्यातील आतकोनेश्वर नगर भागातील महापालिकेच्या कोरोना लसीकरण केंद्रावर एका व्यक्तीला कोरोना लसीऐवजी रेबीजची लस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात महापौर नरेश म्हस्के यांना माहिती होताच, त्यांनी मंगळवारी या संदर्भात आपल्या दालनात पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची कान उघाडणी केली. वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांमुळे पालिकेची नाहक बदनामी होत आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून येथील डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली. दरम्यान ज्या व्यक्तीला रेबीजची लस देण्यात आली आहे. त्याची प्रकृती उत्तम असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.