ठाणे : राबोडीतील इमारत दुर्घटना दुर्दैवी असून इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी क्लस्टर योजनेला स्थानिकांनी सहकार्य केले पाहिजे, तरच यातून मार्ग निघेल आणि अशा दुर्घटना होणार नाहीत. क्लस्टर योजना ठाण्यात राबविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना राज्य शासनाच्या वतीने पूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासन ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले.
राबोडी परिसरातील खत्री अपार्टमेंट या तळअधिक चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील छताचा भाग रविवारी सकाळी ६ वाजता कोसळला. या घटनेत दोघांचा मृत्यू तर दहा वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. या ठिकाणी पालकमंत्री शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि महापौर नरेश म्हस्के यांनीही भेट देऊन पाहणी करीत स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला.
अचानकपणे अशा प्रकारच्या घटना जेव्हा घडतात, तेव्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधीही हतबल होतात. त्यामुळे आपला जीव धोक्यात न घालता धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी तत्काळ स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महापौरांनी या वेळी केले. दरम्यान, या दुर्घटनेची सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत असून, चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यानी ‘लोकमत’ला दिली.