कल्याण : पश्चिमेकडील रेल्वेस्थानक परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांची मुजोरी कायम आहे. सहायक पोलीस आयुक्तांनी महिनाभरात रात्री दोनवेळा कोम्बिंग ऑपरेशन करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे कारवाईलाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असून शुक्रवारी सकाळी तर रिक्षाचालकांनी स्टेशन परिसराला अक्षरश: वेढा घातला होता. रिक्षांच्या दाटीवाटीमुळे चालण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने रिक्षाचालक आणि नागरिकांमध्ये खटकेही उडाले. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.
स्टेशन परिसरातील पश्चिमेला कर्जत दिशेला असलेल्या पादचारी पुलावरून उतरले की, सरकत्या जिन्याला लागून एक चारचाकी वाहनांसाठी मोकळी जागा आहे. त्याला लागूनच कल्याण ते उल्हासनगरकडे जाणाऱ्या रिक्षांसाठी मोठे रिक्षास्टॅण्ड आहे. रिक्षास्टॅण्ड असतानाही रस्त्यावर स्कायवॉकच्या खाली साइडभाडे भरणाºया रिक्षाचालकांची रांग लागलेली असते. ही रांग रिक्षा-चालक-मालक संघटनेच्या कार्यालयासमोर लागते. संघटनेकडूनही या रिक्षांबाबत काहीच हरकत घेतली जात नाही. या रांगेच्या विरुद्ध दिशेला कल्याण शहरातील साइडभाडे भरणारे रिक्षाचालक रस्त्यावरच रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे तिकीटघराच्या अगदी समोर पादचाऱ्यांसाठी मोकळी जागा आहे. त्याला लागूनच टांगास्टॅण्ड असून पुढे लालचौकी, खडकपाडा या ठिकाणी जाणाºया रिक्षा उभ्या राहतात. या रिक्षांची रांग बाहेरचा रस्ताच अडवून ठेवतात. तसेच त्याला लागून थेट भाडे भरणाºया रिक्षाचालकांची रांग असते. एसटी डेपोच्या दोन्ही प्रवेशद्वारांसमोरच्या रस्त्यादरम्यान साइडभाडे भरणाºया रिक्षांची रांग असते. टाटानाका, नेतिवली, मेट्रो मॉलचे भाडे भरले जाते. त्यांच्यासाठी अधिकृत रिक्षास्टॅण्ड रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रासमोर दिले आहे. मात्र, बेशिस्तपणे रस्त्यावर रिक्षा उभ्या करत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच, पादचारी रस्त्याच्या बाजूने चालूही शकत नाहीत. सकाळ-संध्याकाळ स्टेशन परिसराला रिक्षांचा गराडा असतो. महापालिका व एमएमआरडीएने पादचाºयांना स्थानकाच्या गर्दीतून बाहेर पडता यावे, यासाठी स्कायवॉक तयार केला. या स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे बस्तान असल्याने पादचारी धड स्कायवॉकचा वापर करू शकत नाहीत, अशी स्थिती आहे.
वाहतूक पोलीस फारशी कारवाई करत नाहीत. गस्तीसाठी असलेले स्टेशन परिसरातील दोन पोलीस तेथे उपस्थित नसल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे रिक्षाचालकांना मोकळे रान मिळते. बेशिस्त रिक्षाचालकांमुळे नियमाने रिक्षा व्यवसाय करणारे बदनाम होतात आणि त्यांनाही फटका बसतो. एकीकडे बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात ओरड केली जात आहे, तर दुसरीकडे सरकारने मुक्त रिक्षा परवाना धोरण अवलंबल्याने रिक्षांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे रिक्षाचालकांसाठी असलेले रिक्षास्टॅण्ड कमी पडू लागले, असा दावा केला जात आहे. दरम्यान, स्टेशन परिसरात काल रात्रीच्या सुमारास कारवाई करण्यात आली. २५ बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात कारवाई करून चार रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित रिक्षाचालकांकडून दंड वसूल केला आहे. कारवाईत सातत्य ठेवले जाणार असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे.
कारवाईत सातत्य नाहीमहिनाभरात स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांच्या विरोधात सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दोनवेळा कारवाई केली. एक वेळेस कोम्बिंग ऑपरेशन केले. तर, दुसऱ्या वेळेस ऑलआउट ऑपरेशन केले. या दोन्ही कारवाईनंतर परिस्थिती फारशी बदललेली नाही. रिक्षाचालकांना या कारवाईमुळे जरब बसलेली नाही. पोलीस कारवाईसाठी येतात, तेव्हा रिक्षाचालकांची पळापळ होते. तासाभरासाठी रिक्षास्टॅण्डचा परिसर मोकळा होतो. पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती असते. पोलिसांच्या कारवाईत सातत्य असेल, तर बेशिस्त रिक्षाचालकांना जरब बसून नागरिकांना दिलासा मिळू शकतो.