कल्याण : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे दिवा-वसई मार्गावर डोंबिवली पश्चिमेत मोठागाव ठाकुर्ली येथे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या मुद्यावरून शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे यांच्यात सोमवारी केडीएमसीच्या महासभेत शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे प्रेक्षक गॅलरीतील दोघांच्या समर्थकांनी सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात शिवीगाळ आणि झटापटही झाली. पोलिसांनी काही समर्थकांना ताब्यात घेतल्यावर वातावरण निवळले. या प्रकरणावरून महापालिकेची सुरक्षाव्यवस्था कितपत सक्षम आहे, हे उघडकीस आले.मोठागाव ठाकुर्लीच्या पुलाचा मुद्दा दीपेश म्हात्रे यांनी सोमवारी महासभेत मांडला. यावेळी शहर अभियंते प्रमोद कुलकर्णी पुलाविषयी माहिती देत होते. त्यावेळी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी हरकत घेतली. दीपेश यांच्या शेजारी बसलेला त्यांचा भाऊ व नगरसेवक जयेश यांनी दीपेश बोलतो, त्याला बोलू द्या, हरकत घेण्याचा विषयच नाही, असे सांगितले. त्यावर रमेश म्हात्रे म्हणाले, माझी हरकत आहे, मला बोलायचे आहे. त्यावर दीपेश यांनी मला माझे म्हणणे मांडू द्या. हरकतीचा प्रश्नच येत नाही, असे सांगताच जयेश यांची रमेश म्हात्रे यांच्याशी शाब्दिक चकमक झाली. हा प्रकार पाहून प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोन्ही नगरसेवकांच्या समर्थकांनी सभागृहाच्या दिशेने धाव घेतली. सुरक्षारक्षकांना न जुमानता त्यांनी मेटल डिटेक्टर व टेबलला धक्का देत सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. दीपेश व रमेश म्हात्रे हे आपल्या समर्थकांना शांत राहण्यास सांगत होते. मात्र, तरीही समर्थक जुमानत नव्हते. दोन्ही समर्थकांत झटापट व शिवीगाळ झाली. यावेळी नगरसेवक राजेंद्र देवळेकर, प्रकाश पेणकर, कासीब तानकी, सुधीर बासरे यांनी मध्यस्थी करत दीपेश, जयेश आणि रमेश म्हात्रे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. काही नगरसेवकांनी बाहेर धाव घेऊन समर्थकांना शांत राहा, काही झालेले नाही, असे सांगूनही समर्थक शांत होत नव्हते. अखेरीस नगरसेविका वैजयंती घोलप व सुरक्षारक्षक सरिता चरेगावकर यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. शांत राहा, असे सांगितले. हा सगळा प्रकार सुरू असताना पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी काही समर्थकांना ताब्यात घेत पिटाळून लावले.>चुकीची, दिशाभूल करणारी माहितीसभा संपल्यावर रमेश म्हात्रे म्हणाले, बाहेर काय झाले, हे आम्हाला माहीत नाही. आतमध्ये मोठागाव ठाकुर्ली पुलाविषयी शहर अभियंते प्रमोद कुलकर्णी यांनी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली. त्यामुळे दीपेश, जयेश यांच्यासोबत शाब्दिक चकमक उडाली. चुकीची माहिती देऊन नगरसेवकांमध्ये भांडण लावून देणारे कुलकर्णी या घटनेला जबाबदार आहेत.मला मिळालेली माहिती बरोबरप्रशासनाकडून रमेश म्हात्रे यांना चुकीची माहिती दिली गेली. मला मिळालेली माहिती बरोबर होती. त्यावर, मी बोलत असताना त्यांनी हरकत घेतल्याने शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावर सभागृहाबाहेर काय झाले, हे मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे.महासभेसाठी देणार पासआयुक्त गोविंद बोडके यांनी सांगितले की, महासभेसाठी यापुढे पास दिला जाईल. त्याव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
शिवसेनेच्या म्हात्रेंमध्ये राडा, सभागृहाबाहेर समर्थकांमध्ये झटापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 2:35 AM