ठाणे - राज्यात एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीची सत्ता असतांना ठाणे महापालिकेत मात्र शिवसेना राष्ट्रवादी कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले दिसतात. बुधवारीही महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक एकमेकांना भिडल्याचे चित्र पहायला मिळाले. विरोधी पक्षनेते (राष्ट्रवादी) अशरफ पठाण यांनी मुंब्रा भागातील पाणीप्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरून महापौर नरेश म्हस्के यांच्यासमोर झोपून जोरदार घोषणाबाजी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महानगरपालिकेच्या महासभेत विरोधी पक्षनेते पठाण आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक विकास कामे होत नसल्याच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले होते. महासभा सुरू असतांना पठाण यांनी मुंब्रा भागातील पाणीप्रश्नावर प्रशासनासह महापौर म्हस्के यांनाही धारेवर धरले. महापौरांसमोरच झोपून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासन नेहमीच आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते, तसेच आमच्या प्रभागातील विकासकामे होऊ देत नाही, असा गंभीर आरोप करून राष्ट्रवादीच्या अन्य नगरसेवकांनी हे आंदोलन केले. हीच संधी साधून राज्यात विरोधी बाकावर असलेल्या भाजपनेही त्यांना साथ दिली. आम्ही दोघे भाऊभाऊ आम्ही सर्व मिळून खाऊ, महाआघाडीत झाली बिघाडी, अशा घोषणा देऊन शिवसेना-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना त्यांनी डिवचले. महासभेत बराच वेळ सत्ताधारी आणि विरोधक असा गोंधळ सुरू होता.