मीरा रोड - विरोधी पक्षांच्या स्थानिक नगरसेवकांना डावलून कचºयाचे डबेवाटपाचा खुद्द महापौर डिम्पल मेहता यांनीच घातलेला घाट काँग्रेस नगरसेवकांच्या विरोधानंतर गुंडाळण्यात आला. काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांना त्यांच्याच प्रभागात डावलण्याची राजकीय खेळी सत्ताधारी भाजपाकडून चालवल्याने कचºयाच्या डब्यांच्या वाटपावरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत.ओला व सुका कच-याचे वर्गीकरण कायद्याने बंधनकारक असताना आजही शहरात त्याचे काटेकोर पालन केले जात नाही. लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाकडून याबाबत सातत्य व सक्तीची कारवाई केली जात नसल्याने नागरिकांनीही कचरा वर्गीकरण गांभीर्याने घेतलेले नाही. शहरातील कचरा वर्गीकरण बारगळले असताना दुसरीकडे मतदारांना खूश करण्यासाठी त्यांना ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी विनामूल्य कच-याचे डबे देण्याचा निर्णय घेण्यात आला. वास्तविक, ही डबेखरेदीही नागरिकांच्या करांद्वारे मिळालेल्या पैशांतूनच केली जाणार आहे.डबेवाटपाचा महापौर, उपमहापौर, आयुक्त, विरोधी पक्षनेते, प्रभाग समिती सभापती आदी पदाधिकाºयांच्या हस्ते प्रातिनिधिक डबेवाटपाचा कार्यक्रम उरकून नंतर स्थानिक नगरसेवकांमार्फत प्रभागातील इमारती आदींना डबे देणे अपेक्षित होते. असे असताना काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये मात्र त्यांना डावलून थेट महापौर मेहता यांच्या हस्ते कचºयाचे डबे वाटण्याचा प्रयत्न मीरा रोडमध्ये गुरुवारी झाला.येथील प्रभाग क्र. १९ मध्ये काँग्रेसचे अनिल सावंत, मर्लिन डिसा, रूबिना शेख व राजीव मेहरा असे चार नगरसेवक आहेत. शीतलनगर, साईबाबानगर, गोविंदनगर, नयानगर आदी परिसर या प्रभागात येतो. प्रभागातील इमारतींना कचºयाचे डबे वाटण्यासाठी आधी महापौरांच्या हस्ते कार्यक्रम करण्याचे सांगण्यात आले. त्याला स्थानिक नगरसेवकांनी सहमती दर्शवली. पण, गुरुवारी सकाळी मात्र सावंत यांना कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांनी कळवले. सावंत यांनी आयुक्तांना ही बाब सांगितली असता बालाजी खतगावकर यांनी तुम्ही डबेवाटपाचा कार्यक्रम करून घ्या, असे स्पष्ट केले.उडाली शाब्दिक चकमकमहापौर मेहतांच्या हस्ते डबेवाटपाचा कार्यक्रम सुरू झाल्याचे कळताच सावंत तेथे पोहोचले. स्थानिक नगरसेवकांना डावल्याने चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. तर, महापौरांनीही आपण प्रभाग अधिकाºयास नगरसेवकांना कळवा, असे सांगितल्याचे स्पष्ट केले. महापौर गेल्यावर काँग्रेसच्या नगरसेवकांनी डबे वाटले.प्रभाग अधिकारी बोरसे यांनी आधी कार्यक्रम रद्द झाल्याचे सांगितले. मात्र, दुसरीकडे महापौरांच्या हस्ते डबेवाटप सुरू केले. स्थानिक नगरसेवकांना मुद्दाम डावलण्याचा प्रकार महापौर, सत्ताधारी भाजपा व त्यांच्या तालावर प्रशासन करत आहे. - अनिल सावंत, नगरसेवक, काँग्रेसकार्यक्रम रद्द झाल्याचे आपण सांगितलेच नसून नगरसेवक खोटे बोलत आहेत. कार्यक्रमाची माहिती आदल्या दिवशीच दिली होती. महापौरांनी येणार असल्याचे सांगितल्याने त्यांच्या हस्ते डबेवाटप केले. - चंद्रकांत बोरसे, प्रभाग अधिकारी
सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव, स्थानिक नगरसेवकांना डावलल्याने संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 2:39 AM