- अनिकेत घमंडीडोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक राहुल दामले यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती खास सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या पक्षांतर्गत घडामोडी, बैठका यामधून दामले यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात आले.सभापतीपदासाठी दामले यांच्यासह पहिल्यांदाच नगरसेवक झालेले संदीप पुराणिक आणि कल्याण पूर्वचे नगरसेवक मनोज राय यांच्या नावाची चर्चा होती. त्यात अखेरीज दामले यांचे नाव आघाडीवर आले असून यामुळे डोंबिवलीला महत्त्वाचे पद मिळणार आहे. दामले हे सभापती झाल्यावर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यानंतर भाजपातर्फे स्थायीचे पद मिळवणारे ते पहिलेच सभापती असतील. दामले हे पेंडसेनगर भागातून भाजपाच्या तिकिटावर तीन वेळा निवडून आले आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या श्री गणेश मंदिर संस्थानाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी बाजी मारत अध्यक्षपद मिळवले. ते महापालिकेत भाजपाचे गटनतेने असून स्थायी समितीचे सदस्य आहेत. पक्षकामाचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. पक्षांतर्गत दबावतंत्रामुळे त्यांनी मध्यंतरी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. पण पक्षनिष्ठेसाठी तो मागे घेत त्यांनी पक्षाचे काम सुरु ठेवले.पुराणिक यांच्या नावासाठी राज्यमंत्री चव्हाण यांना काही नगरसेवकांनी भेटून शिफारस करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो असफल झाला. भाजपातीलच एका गटाने भाजपा समर्थक नगरसेवक कुणाल पाटील यांना स्थायीचे सभापतीपद द्यावे अशी मागणी केली होती. पण दामले यांचे पारडे जड ठरले.सेनेला रोखणारा चेहरा : पालिकेत सध्या शिवसेना-भाजपाची युती सत्तेत असली तरीही प्रत्यक्षात दोन्ही पक्षांत तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे पालिकेत शिवसेनेला थोपवण्यासाठी दामले यांच्या अनुभवाचा पक्षाला उपयोग होईल. ते या आधी उपमहापौर होते.मुख्यमंत्र्यांशी बोलणार : पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक गुरुवारी पार पडली. त्यात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपील पाटील, आमदार किसन कथोरे, नरेंद्र पवार आदींची मॅरेथॉन चर्चा झाली. त्यात वेगवेगळ््या विषयांवर चर्चा झाली. त्याबाबत रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्थायी सभापतीपदी राहुल दामले, केडीएमसीसाठी निर्णय, संदीप पुराणिकांचे नाव पडले मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 5:54 AM