- अनिकेत घमंडी डोंबिवली - शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावणा-या डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीगणेश मंदिर संस्थानाच्या अध्यक्षपदी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक, केडीएमसीच्या स्थायीचे सदस्य राहुल दामले यांची बिनविरोध निवड झाली. समाजाचा पैसा समाजापर्यंत पोहचवणे, पारदर्शक कारभार ठेवणे आणि भक्त असो की सर्वसामान्य नागरिक त्यांना या संस्थांनाच्या सोयीसुविधांचा पुरेपूर लाभ मिळावा यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे दामले यांनी लोकमतशी बोलतांना स्पष्ट केले.१७ सप्टेंबर रोजी निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये दामले यांना सर्वाधिक ५५६ मते मिळाली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री संस्थानाच्या आवारात ९नंतर झालेल्या बैठकीत उशिराने एकमताने हा निर्णय घेण्यात आला. याखेरीज संस्थानाच्या उपाध्यक्ष पदी अलका मुतालीक, खजिनदार सुहास आंबेकर, सचिव शिरिष आपटे, सहसचिव निलेश सावंत आदींची निवड करण्यात आली. तसेच अच्युत क-हाडकर, प्रविण दुधे, गौरी खुंटे, राजु कानिटकर, अरुण नाटेकर, मंदार हळबे हे विश्वस्त म्हणुन काम पाहणार असून पाच वर्षे ही कार्यकारणी कार्यरत असेल. माजी अध्यक्ष अच्युत क-हाडकर यांनी अध्यक्षपदाची सुत्र नवनिर्वाचीत अध्यक्ष दामलेंना मंगळवारीच्या बैठकीत सुपुर्द केली.दामले पुढे म्हणाले की, संस्थानाचे एक मोठे उद्दीष्ठ डायलीसीस सेंटर तातडीने उभारण्यात येणार असून त्यासाठी केडीएमसीचे सहाय्य महत्वाचे ठरणार आहे. त्यादृष्टीने तातडीने प्रयत्न सुरु करण्यात आले असून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पीपी चेंबरमध्ये महापालिकेच्या जागेत ते सुरु व्हावे अशी संस्थांनाची धारणा असून त्यादृष्टीने पत्रव्यवहार याआधी झाला आहे. तो पाठपुरावा करणे आणि ते केंद्र अल्पावधीत सुरु करणे हाच अजेंडा असल्याचे ते म्हणाले.दामले यांची संस्थानाच्या कार्यकारणीमध्ये चौथ्यांदा निवड झाली असून ते या संस्थानाशी ३५ हून अधिक वर्षे जोडले गेलेले आहेत. त्यानंतर त्यांचा राजकारणाशी, भाजपशी संबंध आला, ते नगरसेवक झाले. पक्षाचे गटनेते, स्थायीचे सदस्य, उपमहापौर हा त्यांचा भाजपमधील महत्वाचा प्रवास आहे. पण संस्थानाचा उपयोग राजकारणाशी कधीही केला नाही, करणार नाही असे त्यांनी लोकमतशी बोलतांना स्पष्ट केले. राजकारण राजकारणाच्या जागी आणि अध्यात्म, सांस्कृतिक केंद्र हे समाजसेवेसाठी हे सुत्र कायम ध्यानात ठेवूनच कार्यरत असल्याने अत्यंत कमी वयात मला गणेश मंदिर संस्थानाचे अध्यक्षपद मिळाले हे माझे भाग्य आहे. माझ्या शुभचिंतकांमुळे हे शक्य झाले असून नागरिकांनी त्यांच्या संस्थानाकडुन असलेल्या अपेक्षांबाबत मला थेट भेटावे, मला सूचित करावे. आवश्यक ते बदल तातडीने करण्यात येतील असेही आवाहन त्यांनी केले.
गणेशमंदिर संस्थानाच्या अध्यक्षपदी राहुल दामले बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 7:56 PM