लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा- आरिफ नसीम खान
By नितीन पंडित | Published: March 13, 2024 07:54 PM2024-03-13T19:54:37+5:302024-03-13T19:55:10+5:30
"भाजपाचे केंद्रातील सरकारने दहा वर्षात विकासाच्या नावाखाली विनाश केला आहे"
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: देशातील लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा सुरु केली असून निवडणुकीची वेळ असली तरी राहुल गांधी यांनी तीन वर्षांपासून देशात न्याय यात्रेचा प्रयोग केला आहे, तो या देशाला एकजूट ठेवण्यासाठी तसेच लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी आहे.देशातील लोकांसमोर प्रश्न आहे देशाची लोकशाही वाचणार की नाही. देशात बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत.तरुण महिला शेतकरी उद्योजक या सर्व वर्गासमोर प्रश्न उभा आहे.भाजपाचे केंद्रातील सरकारने दहा वर्षात विकासाच्या नावाखाली विनाश केला आहे. खोटे बोलतात रेटून बोलतात वस्तुस्थिती कोणी समोर ठेवत नाही ,खरी माहिती जनतेसमोर ठेऊन जनतेने त्यावर विचार केला पाहिजे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी मंत्री आरिफ नसीम खान यांनी दिली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा १५ मार्च रोजी दुपारी दोन वाजता भिवंडी तालुक्यात दाखल होणार असून १५ मार्च रोजी शहरातील स्वर्गीय आनंद दिघे चौक येथे सायंकाळी ५ वाजता राहुल गांधी यांची सभा होणार असून तेथून त्यांचा मुक्काम सोनाळे ग्रामपंचायत क्रीडांगण या ठिकाणी होणार असून याठिकाणची व्यवस्था व पाहणी करण्यासाठी खान बुधवारी भिवंडीत आले होते.या प्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे,शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन माजी खासदार सुरेश टावरे,तालुकाध्यक्ष विजय पाटील यांसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महविकास आघाडीतील शरद पवार,उद्धव ठाकरे हे देशातील लोकशाही वाचविण्यासाठी लढत आहेत.भिवंडीत न्याय यात्रा येत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहेच पण सर्वसामान्य जनतेला सुध्दा या यात्रेची उत्सुकता आहे.ऐतिहासिक अशी गर्दी यानिमित्ताने होणार असल्याची माहिती देत खोटी आश्वासन देऊ भावनात्मक आव्हान करून भाजपाने देशातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे.त्यामुळे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार गावागावां मध्ये पोहोचणार आहे.त्याचा फायदा नक्कीच काँग्रेसला होईल असा विश्वास आरिफ नसीम खान यांनी शेवटी व्यक्त केला.