ठाणे : भारत जोडो न्याय यात्रेनिमित्ताने राहुल गांधी ठाणे, कळवा, मुंब्रा भागात येणार आहेत. या निमित्ताने काँग्रेसने ठाणे शहरात मोठ्याप्रमाणात फलकबाजी केली आहे. तर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा शहरात फलक उभारले आहे.
शनिवारी सकाळी १०.३० वाजता कौसा येथून या यात्रेची सुरूवात होईल. या निमित्ताने ठाणे पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवणार आहे. यात्रेच्या भागात ड्रोन उडविण्यास बंदी लागू आहे. इंडिया आघाडीचे ठाणे जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी या यात्रेत सहभागी असतील. या निमीत्ताने शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभीनाका येथील स्मारकाला ते पुष्पाहार अर्पण करणार आहेत.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या कामाचा आवाका ठाणे, मुंबई, पालघर या भागात मोठा होता. त्यामुळे त्यांच्या निधनानंतरही सर्वच पक्षातील नेते त्यांचे आजही आदर करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील अनेक नेत्यांचे आनंद दिघे हे राजकीय गुरु होते. शनिवारी राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेनिमित्ताने ठाण्यात येणार आहे. मुंब्रा येथील कौसा भागातून त्यांची यात्रा सुरू होणार आहे.
कळवा येथे आल्यानंतर राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर कोर्टनाका येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करतील. येथील काही मीटर अंतरावरील टेंभीनाका परिसरात आनंद दिघे यांचा मठ आहे. या आनंद मठाजवळच आनंद दिघे यांचे स्मारकही बांधण्यात आले आहे. या स्मारकाला राहुल गांधी पुष्पहार अर्पण करणार आहेत. यात्रा जांभळीनाका येथे आल्यानंतर त्यांची एक चौकसभा होणार आहे. राहुल गांधी हे त्यांच्या वाहनातूनच नागरिकांना संबोधित करतील. त्यानंतर ठाण्यातील एका सभागृहात ते माध्यमांसोबत संवाद साधणार आहेत.