लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रा मार्च महिन्यात ठाण्यात धडकणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू झाली असून, त्याचे नियोजन केले जात आहे. ठाण्यातील विविध भागांतून ही न्याय यात्रा जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे राहुल गांधी या यात्रेच्या निमित्ताने प्रथमच ठाण्यात येत आहेत.
ठाणे जिल्हा हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. येथून खासदार, आमदार, महापौर काँग्रेसचे झाले आहेत. परंतु, मागील काही वर्षांत ठाण्यासह जिल्ह्यात काँग्रेस पिछाडीवर गेली आहे. ठाणे पालिकेतही काँग्रेसचे तीनच नगरसेवक आहेत. तर जिल्ह्यातही काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. परंतु, आता राहुल गांधी यांच्या यात्रेनिमित्ताने ठाणे काँग्रेसला उभारी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १२ मार्च रोजी ठाण्यात धडकणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. त्यानुसार यासंदर्भात बुधवारी यात्रेच्या नियोजनाबाबत बैठक झाली.
ही यात्रा ठाण्यातील कोणकोणत्या भागातून नेणे अपेक्षित आहे, त्याचेही नियोजन आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार ठाण्यातील कळवा, खारेगाव, शहरी भाग, कॅडबरी, रेमंड आदी भागांतून ही यात्रा घोडबंदर मार्गे पुढे जाणार असल्याचेही सांगितले जाते.इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे दौरेयापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी साधारणपणे १९७६ - ७७ च्या आसपास ठाण्यात हजेरी लावली होती. त्यानंतर १९८० च्या सुमारास राजीव गांधी यांनीही आमदारकीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने ठाण्यात हजेरी लावली होती. त्यानंतर गांधी घराण्यातील एकही व्यक्ती ठाण्यात आलेली नाही. राहुल गांधी हे कोर्ट केसनिमित्ताने भिवंडीला येऊन गेले आहेत. परंतु, ठाण्यात ते प्रथमच येत आहेत.