ठाणे : काँग्रेस खा. राहुल गांधी यांची न्याय यात्रा १२ मार्च रोजी गुजरातमधून नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल. त्यानंतर धुळे, मालेगाव, नाशिक आणि वाडा मार्गाने त्यांचे ठाणे शहरात आगमन होणार आहे. ठाण्यात १६ मार्चला जांभळी नाका येथे राहुल गांधी यांची सभा होईल. सभेसाठी व्यासपीठ उभारले जाणार नाही. १७ मार्चला दादर चैत्यभूमी येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. याच दिवशी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा ही १६ मार्च रोजी ठाण्यातून पुढे जाणार आहे. त्याची पूर्वतयारी करण्याकरिता शनिवारी सकाळी बाळासाहेब थोरात हे ठाण्यातील शहर काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात आले होते. त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत यात्रेच्या मार्गाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भिवंडीची जागा काँग्रेसचीभिवंडी लोकसभेच्या जागेची मागणी शरद पवार यांनीदेखील केली आहे. मात्र काँग्रेसने भिवंडीची मागणी केली आहे. ही जागा काँग्रेसची होती. ती काँग्रेसलाच मिळाली पाहिजे. जागावाटपात नवीन चेहऱ्याला संधी मिळणार असल्याची माहिती थोरात यांनी दिली.
महायुतीतील तिघांमध्ये संघर्ष राज्यात खोके सरकार असून त्यांची आपापसात भांडणे सुरू आहेत, एक आमदार पोलिस ठाण्यात गोळीबार करतो. , आमदारांमध्ये विधानसभा पटांगणात धक्काबुक्की झाली, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. संयम सुटलेले सर्व लोक त्यांच्याकडे आहेत, असे थोरात म्हणाले. शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपला लगावलेल्या टोल्यावर थोरात म्हणाले की, तिघांमधील संघर्ष आता दिसून येत आहे. हा तर ट्रेलर असून जसजशी निवडणूक जवळ येईल तसा सिनेमा पाहायला मिळणार असल्याचेही ते म्हणाले.