राहुल गांधी यांना गैरहजर राहण्याची मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 04:58 AM2018-04-24T04:58:05+5:302018-04-24T04:58:05+5:30
सध्या कर्नाटक निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याने, ते पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहेत.
भिवंडी : महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडवून आणल्याच्या, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या लोकसभा प्रचारादरम्यानच्या आरोपावरील याचिकेची सुनावणी २ मे रोजी होणार आहे. सध्या कर्नाटक निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याने, ते पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या वकिलांनी प्रत्यक्ष हजर राहण्यापासून मागितलेली सवलत सोमवारच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी मंजूर केली.
सोनाळे येथे झालेल्या जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यावरून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी कोर्टात ही अवमान याचिका दाखल केली आहे. दरम्यान, ही याचिका समन्स ट्रायल प्रक्रियेप्रमाणे चालविण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांचे वकील अॅड. नारायण अय्यर यांनी लेखी अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली आहे. सध्या याचिका समरी ट्रायल प्रक्रियेनुसार सुरू होती. मात्र, या याचिकेचा संदर्भ ऐतिहासिक असल्याने, त्याला भक्कम पुरावा अपेक्षित आहे. त्यामुळे ही याचिका समन्स ट्रायल प्रक्रियेनुसार चालवावी, असा विनंती अर्ज कोर्टाला दिल्याची माहिती अय्यर यांनी दिली. या अर्जावरील सुनावणी २ मे रोजी होणार आहे, असे त्यांनी सांगितले.