भिवंडी - अगरबत्तीसाठी लागणारा कच्चा माल आणून भिवंडी-काल्हेर येथे सुप्रसिद्ध ब्रॅंडने त्याची विक्री सुगंधित अगरबत्ती म्हणून होत असल्याची घटना समोर आली आहे. या अगरबत्तीमधील केमिकल वापरण्यास बंदी आहे. तसेच कुठलाही शासन परवाना न घेता त्याचा अगरबत्तीमध्ये सर्रास वापर केला जात होता. ठाणे कृषी अधिकाऱ्यांना याबाबती माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. ठाणे कृषी अधिकारी व घरगुती कीटकनाशक नियंत्रण संघाच्या समन्वयाने कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या छापेमारी स्लिपवेल, बालाजी रिलॅक्स, किलर आणि रिलीफ यांसारख्या या ब्रॅण्डनावांसह काही असुरक्षित धूप कांड्या सापडल्या आहेत.
सध्या सुगंधी अगरबत्तीसह मच्छर अगरबत्ती मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात. या अगरबत्तीसाठी लागणारा कच्चा माल चीनमधून आयात करून त्यांना भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील कारखान्यात विविध सुगंधी रासायनिक द्रव्यांत मिसळीत करून विकला जातो. अगरबत्त्या विविध नावाने पॅकिंग करून विक्री करण्याचा कारखाना 'डिवाईन फ्रॅग्नेंसीस' बी१/बीं२ राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स, काल्हेर, भिवंडी येथे मोकाटपणे सुरु होता. चौकशीत आढळले डिवाईन फ्रॅग्नेंसीस कंपनीकडे रासायनिक द्रव्य वापरण्याचा कोणताही परवाना नाही. कारखान्यातील रासायनिक द्रव्य कृषी क्षेत्रात फवारणी म्हणून वापरले जाणारे व आरोग्यास घातक असून त्याचा अतिवापर मानवी आरोग्यास घातक आहे.
होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (एचआयसीए) चे संचालक, जयंत देशपांडे यांनी याबाबत माहिती दिली. जयंत देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रसायन मानवी आरोग्यास फार हानिकारक आहे व त्याचा शेतीमध्ये फवारणी साठी किती प्रमाणात उपयोग केला जावा याची एक गाईडलाईन निश्चित केली आहे. रसायन अति प्रमाणात वापरल्यास विविध आजार होण्याची शक्यता आहे. उदा. त्वचा विकार, डोळ्यांचे विकार, फुफुसाला संसर्ग किंवा मनुष्याच्या जीवितास सुद्धा धोका होऊ शकतो.
विदर्भात औषध फवारणीमुळे कित्येक कुटुंबाचे जीव गेल्याची घटना ताजी असतानाच कृषी विभाग, ठाणे व होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (एचआयसीए) यांच्या मदतीने भिवंडीतील कारखान्यावर छापेमारी करण्यात आली. यावेळी कारखान्यात मानवी आरोग्यास घातक असा रासायनिक साठा विनापरवाना आढळून आला. येथील रसायनांचे सर्व नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर सदर कारखान्यावर कारवाई केली जाणार आहे.